दीपक मोहिते
वास्तव लक्षात घ्या,
मुंबई व ठाणे जिल्ह्यात मराठी बोलणाऱ्यांची संख्या घसरणीवर,
गेल्या अनेक वर्षांपासून मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा, म्हणून आपण केंद्र सरकारकडे सतत पाठपुरावा करत होतो. पण सरकार काही दाद देत नव्हते. मात्र दोन वर्षांपूर्वी ऐन निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकारने याविषयी निर्णय घेतला. केंद्र सरकारच्या या निर्णयाने महाराष्ट्रातील जनता चांगलीच सुखावली. पण मराठी भाषा किती बोलली जाते, याबाबतच्या आकडेवारीवरून जर एक नजर टाकली तर किती भयावह स्थिती आहे, हे आपल्याला जाणवते.
अशी परिस्थिती का व कशी निर्माण झाली यासाठी आपल्याला इतिहासात डोकवावे लागणार आहे.सन १९५१ साली राज्य पुनरर्चना आयोगाच्या अहवालानुसार मुंबई शहरात मराठी माणसे ४३.६ % होते. त्यानंतरच्या ५० वर्षात २००१ साली ते प्रमाण ३९ % वर आले.त्यानंतर अवघ्या दहा वर्षात म्हणजे २०११ साली ते ४ % ने घसरून ३५.०९ टक्क्यावर आले. दुसरीकडे हिंदी बोलणाऱ्यांची संख्या मात्र ४० % ने वाढली. हिंदी बोलणारे २५.८८ लाख परप्रांतीय होते ते ३५.९८ लाखावर गेले. आज २०२६ साली मराठी बोलणाऱ्यांची संख्या ३५.४ टक्क्यावर आली आहे. शंभर वर्षांपूर्वी मुंबई शहरात ८४ % लोक स्थलांतरीत होते, त्यामध्ये गिरणी, उद्योग,बॉलिवूड व अन्य व्यवसायात काम मिळवण्यासाठी देशभरातून लोक आले. त्यामध्ये हिंदी – २२.९ % उर्दू – १३.३ % गुजराती – १२ % असे प्रमाण होते. गेल्या तीस वर्षात मुंबईतील मराठी कुटुंबे पालघर, वसई – विरार, कल्याण – डोंबिवली – बदलापूर व पनवेलला ढकलली गेली. मुंबई शहरातील ६१.६५ % पालघर व ४९.७८ % लोक ठाणे शहरात स्थलांतरीत झाली. आजच्या घडीला हिंदी व गुजराती भाषिकांच्या वाढीचा दर मराठीपेक्षा कितीतरी पटीने अधिक आहे. त्यामुळे पुढील जनगणनेत मराठी बोलणाऱ्यांची संख्या ३० % च्या खाली जाण्याची शक्यता आहे. आज राज्याच्या ग्रामीण भागातील जिल्हानिहाय आकडेवारी पाहता मुंबई व ठाणे जिल्ह्यात मराठी बोलणाऱ्यांची संख्या पार उतरणीला लागल्याचे पाहायला मिळते.
मुंबई – ३५.५ %,
ठाणे – ४९.७८ %,
पालघर – ६१.६५ %,
रायगड – ७९.०४ %,
रत्नागिरी – ८८.१८ %,
सिंधुदुर्ग – ९१.०२ %,
नंदुरबार – १६.०४ %,
धुळे – ३३.७८ %,
जळगाव – ६३.४५ %,
अकोला – ७०.३९ %,
नाशिक – ७२.४२ %,
छ. संभाजीनगर – ६९.६६ %,
अहिल्यानगर – ८८.८९ %,
पुणे – ७८.१७ %,
सातारा – ९५.०५ %,
कोल्हापूर – ८९.१६ %,
लातूर – ८१.७५ %,
नांदेड – ७५.४६ %,
हिंगोली – ८३.५३ %,
वाशिम – ७५.७८ %,
यवतमाळ – ६७.५७ %,
चंद्रपूर – ८३.६३ %,
गडचिरोली – ५६.३८ %,
नागपूर – ७०.११ %,
गोंदिया – ७३.११ %,
भंडारा – ९३.१९ %,
अमरावती – ६६.८३ %,
वर्धा – ८७.१८ %,
बुलढाणा – ७८.६७ %,
जालना – ७६.१६ %,
बीड – ८३.३८ %,
मुंबई व ठाणे या दोन जिल्ह्यात मराठी भाषा बोलणाऱ्यांची संख्या किती खाली आली आहे, याचा विचार गांभीर्याने होणे गरजेचे आहे. पण तसे होताना दिसत नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात या दोन शहरात मराठी माणूस औषधालाही मिळणार नाही.

