दिपक मोहिते,
भयावह वास्तव,
भुजलाची पातळी झपाट्याने खालावत चालली आहे…
पावसाचे प्रमाण कमी होणे, भुगर्भातील पाण्याच्या साठ्यात घट होणे व वातावरणात प्रदूषणाची वाढ, अशी चार कारणे, सध्या मानवी जीवनाच्या मुळावर आली आहेत. भुगर्भातील पाण्याचा साठा कमी होणे, हे फार मोठे संकट जगभरात गहिरे होत चालले आहे.
महाराष्ट्रात विशेष करून वसई – विरार व पालघर पट्ट्यात भुजल पातळी दरवर्षी १ ते २ मीटरने खाली जात आहे. १९५० – ६० दरम्यान दहा ते वीस फुटावर लागणारे पाणी आज दोनशे ते तीनशे फुटावरही लागत नाही. यास मानवाचा हव्यास कारणीभूत ठरला आहे. पाण्याचा प्रचंड उपसा ( ७० ते ७५ % ) ग्रामीण भागातील ऊस व भात यासारखी जास्त पाणी लागणारी पिके, बिल्डर लॉबीकडून होणारा बोरवेलचा बेसुमार वापर, विहीर असतानाही तीन ते चार बोरवेलचा अवास्तव वापर, त्यामुळे जमिनीतील पाण्यापेक्षा तीन पट अधिक उपसा,
तर दुसरीकडे ग्लोबल वॉर्मिंगमुळे पावसाचे प्रमाण अनियमित, पूर्वी किमान शंभर दिवस पाऊस पडत असे, आता ते प्रमाण चाळीस दिवसावर आले आहे. शहरी व ग्रामीण भागातील काँक्रिटीकरणामुळे पाणी जमिनीत मुरण्याची प्रक्रिया थंडावली आहे. तसेच भेगा पडलेल्या जमिनी पाणी शोषून घेत नाहीत. ते पाणी थेट समुद्रात वाहून जाते.
औद्योगिक क्षेत्रातून बाहेर पडणारे सांडपाणी, रासायनिक खते, शौचालयाचे पाणी थेट जमिनीत जाणे, त्यामुळे भुगर्भातील पाणी एकदा दूषित झाले कि ते किमान शंभर वर्षे शुद्ध होत नाही. त्या दूषित पाण्यात
नायट्रेट, फ्लोराईड व अर्सेनिकचे प्रमाण वाढते. या सगळ्याचा परिणाम पाण्याची पातळी खाली जाणे, तीव्र पाणीटंचाई निर्माण होणे, पाण्याची गुणवत्ता खराब होणे, जमीन खचणे, असे प्रकार घडत असतात. ते रोखण्यासाठी रेनवॉटर हार्वेस्टिंग सक्तीचे करणे, बोरवेलवर नियंत्रण आणणे, कमी पाणी लागणारी पिके घेणे व सांडपाणी प्रक्रिया राबवणे, अशा उपाययोजना करणे आवश्यक आहे. पावसाचे पाणी साठवा, वृक्ष लागवड करा व पाणी काटकसरीने वापरा, असा त्रिसूत्री कार्यक्रम राबवण्याची नितांत गरज आहे.

