दीपक मोहिते,
” हल्लाबोल, ”
ठाणे जिल्ह्यात शिंदे गटाची प्रतिमा डागाळतेय…
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे, मुंबई लगत असलेल्या ठाणे जिल्ह्यातील वर्चस्वाला आता हादरे बसू लागले आहेत. शिवसेनेचे ( उबाठा ) प्रदीप पूर्णेकर यांच्या निर्घृण हत्येमध्ये त्यांच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे, त्यांचे पती व अन्य तिघांवर गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. या प्रकरणी त्यांच्या पक्षाची जी काही बदनामी झाली त्याची भरपाई होणे, कठीणच आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून ठाणे जिल्हा हा एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मात्र २०२६ च्या सुरुवातीपासून त्यांच्या पक्षाला अनेक धक्के बसू लागले. तरीही आजच्या घडीला जिल्ह्यात त्यांचे वर्चस्व कायम आहे. गेल्या जाने.२०२६ च्या ठाणे महानगरपालिका निवडणुकीत त्यांच्या गटाने १६५ पैकी ७५ जागा जिंकून सगळ्यात मोठा पक्ष म्हणून आपली सत्ता राखली. जिल्ह्यातील कल्याण – डोंबिवली, उल्हासनगर व अंबरनाथमध्येही त्यांची चांगली पकड आहे. २०२२ मध्ये झालेल्या बंडानंतर ठाणे जिल्ह्यातील अनेक शाखा, नगरसेवक व पदाधिकारी त्यांच्या गटात सामील झाले. त्यामुळे संघटनात्मक दृष्टीने खरी ताकद त्यांच्याकडे आहे. पण गेल्या काही महिन्यात घडलेल्या हिंसक घटनामध्ये त्यांच्या गटाच्या लोकांचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे त्यांच्या जनाधाराला तडे जाऊ लागले आहेत. गेल्या महानगरपालिका निवडणुकीत शिंदे यांचे घर ज्या प्रभागात आहे, त्या प्रभाग १३ – अ मध्ये त्यांचे माजी महापौर अशोक वैती यांचा दारुण पराभव झाला. या प्रभागात उबाठा गटाचे शहाजी खुपसे यांनी १२ हजार ८६० मतांनी शिंदे यांचे खंदे समर्थक अशी ओळख असलेल्या अशोक वैती यांना धूळ चारली. हा निकाल एकनाथ शिंदे व त्यांचे खासदार असलेले चिरंजीव डॉ. श्रीकांत शिंदे या दोघा पितापुत्राच्या चांगलाच जिव्हारी लागला. पक्ष संघटना सोबत आला तरी मतदार आपल्यापासून लांब राहीला, हे शल्य त्यांना अद्याप बोचत आहे. त्यानंतर गेल्या सहा महिन्याच्या काळात घडलेल्या तीन मोठ्या घटनामध्ये सातत्याने त्यांच्या गटाच्या पदाधिकाऱ्यांची नांवे आल्यामुळे पक्षाची प्रतिमा चांगलीच डागाळली गेली. खंडणी जबर मारहाण, हत्या, डॉक्टर व महिला कर्मचाऱ्याना मारहाण करणे, अशा प्रकरणाचा त्यामध्ये समावेश आहे. त्यामुळे त्यांच्याविषयीं मध्यमवर्गीय मतदा्रांमध्ये प्रचंड नाराजीचे वातावरण आहे. महायुतिमधील प्रमुख घटक पक्ष असलेल्या भाजपशी त्यांचे तीव्र मतभेद आहेत. जागावाटपावरून त्यांच्यामध्ये सतत रस्सीखेच सुरु असते. डोंबिवलीच्या शास्त्रीनगर डॉक्टर मारहाण, प्रदीप पूर्णेकर यांची निर्घृण हत्या,इ. घटना त्यांच्या लोकप्रियतेला ओहोटी आणणाऱ्या ठरल्या आहेत. भाजप, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक व आ. संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे संघटन अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने भाजप कामाला लागला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत हे तिघे शिंदे गटाला नक्कीच अडचणीत आणू शकतात.

