दीपक मोहिते,
हक्क व अधिकाराची लढाई लढणाऱ्या थोर स्वातंत्र्यसैनिकाला नमन,
पत्रकारितेचे भीष्म पितामह असलेले, इंडियन एक्स्प्रेस वृत्तपत्रसमूहाचे संस्थापक अध्यक्ष आणि स्वातंत्र्य चळवळीतील ज्येष्ठ नेते रामनाथ गोयंका यांचा काल स्मृतिदिन साजरा झाला.
बिहार राज्यात जन्माला आलेल्या रामनाथ गोयंका यानी १९३६ साली द इंडियन एक्प्रेस वृत्तपत्र समूह सुरु केला.आणिबाणीच्या काळात सरकारच्या विरोधात त्यांनी जो संघर्ष केला,त्याची नोंद जगभरात घेण्यात आली. त्यांच्या वृतपत्र समूहावर प्रचंड कारवाई झाली. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यानी आपला वृत्तपत्र समूह चालवला. सरकारची प्रसिद्धि माध्यमावरील सारी बंधने त्यानी मोठ्या धाडसाने झुगारली व आपल्या व्यवसायाशी ते प्रामाणिक राहिले. त्याकाळात सरकारने माध्यमांची प्रचंड गळचेपी चालवली होती, परंतु त्यास धुप न घालता गोयंका यानी जो कणखरपणा दाखवला त्याला इतिहासात तोड़ नाही. पण आज आपली सारी माध्यमे सरकार व उद्योगपतींच्या पायाशी कशी लोळण घेतात, ते आपण पावलोपावली अनुभवत आहोत. काळ बदलला की क्षितिजावर परिवर्तनाची पहाट उगवत असते,असे आपण जुन्या लोकांकडून ऐकत असु ,पण सध्या क्षितिजावर गडद अंधार पसरला असून आता पहाट उगवणे शक्य नाही.आपल्या तत्वाशी कधीही तडजोड न करणाऱ्या व हुकूमशाही आणू पाहणाऱ्या शक्तींना या रोखणाऱ्या या थोर स्वातंत्र्यसैनिकाला स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन,

