दीपक मोहिते,
कालच्या घटनेमुळे सुशिक्षित वसई नगरीचा चेहरा पार काळवंडला गेला,
काल विकासकामाच्या श्रेयवादावरून दिवसभर उडालेला धुरळा अखेर संध्याकाळी खाली बसला व विरारकर नागरिकांनी एकदाचा निश्वास सोडला. वास्तविक हा जो काही संघर्ष उडाला, त्याच्याशी सर्वसामान्य नागरिकाना बिलकुल देणेघेणे नव्हते. श्रेयवादाच्या या चढाओढीत सामान्य माणूस कुठेही पाहायला मिळाला नाही. त्यामध्ये पक्षाचे पदाधिकारी व सतरंज्या उचलणाऱ्या कार्यकर्त्यांचा सर्वाधिक भरणा होता.
सत्ता आणि श्रेय हे एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात. हे नाणे ताब्यात घेण्यासाठी पक्ष अलीकडच्या काळात एकमेकांच्या उरावर बसत असतात. कालच्या घटनेत आपण तेच दृष्य लाईव्ह बघितले.काल लोकार्पण करण्यात आलेले प्रकल्प वर्षानुवर्षे का रखडले ? त्याचा खर्च कसा नाहक वाढला ? याविषयी या दोघाना कोणतेही देणेघेणे नाही. कालचा गोंधळ हा ” ही दोन्ही विकासकामे आमच्यामुळे मार्गी लागली,” या एका वाक्याच्या अवती भवती फिरत होता. हा जो काही गोंधळ झाला, त्यास सत्ताधारी व विरोधी हे दोन्ही पक्ष जितके जबाबदार आहेत. तितकेच महानगरपालिका प्रशासन देखील जबाबदार आहे. पण, या महानगरपालिकेत कणा नसलेल्या अधिकाऱ्यांचा भरणा असल्यामुळे राजकीय मंडळी मनमानी कारभार करत असतात. दर महिन्याला होणाऱ्या महासभेत किती कामकाज होते ? हा एक संशोधनाचा विषय आहे. लोकशाही व्यवस्थेत सत्ताधारी व विरोधी पक्ष यांनी हातात हात घालुन काम करायचे असते. पण येथे हे दोघेही हातात हात घालुन नाही तर ते एकमेकांचे कॉलर पकडून केवळ श्रेयवादाची लढाई लढण्यात धन्यता मानत असतात.
विकासकामाच्या रथाची चाके अशी ओळख असली तरी ही दोन्ही चाके सध्या अहंकाराच्या चिखलात रुतली आहेत. ही स्थिती ” परिसर विकासा, ” साठी धोकादायक ठरणारी आहे. पण या लोकांच्या संवेदना परिसर विकास, सर्वसामान्याचे जिव्हाळ्याचे प्रश्न, नागरी सुविधाचा अभाव, याविषयी पार बोथट झाल्या आहेत. काल जे काही घडले ते भविष्यात आपल्याला पाहायला मिळणाऱ्या ऐतिहासिक शूर्पारक नगरीला नक्कीच भूषणावह नाही.

