दीपक मोहिते,
लोकशाही म्हणजे अल्पमतांचा आदर करणारे बहुमत, – अॅड. जयंत जायभावे,
आज वसई येथील कृपामाता सभागृह, पापडी येथे सुवार्ता साहित्य मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. याप्रसंगी बोलताना मुख्य वक्ते म्हणून महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलचे अध्यक्ष, कायदेतज्ज्ञ अॅड. जयंत जायभावे म्हणाले, ” आपणा सर्वांचे सगळ्यात मोठे राष्ट्रीय कर्तव्य म्हणजे सर्वश्रेष्ठ असलेल्या भारतीय संविधानाची माहिती प्रत्येक भारतीय नागरिकाला असली पाहिजे. लोकांची संविधानाविषयाची निरक्षरता म्हणजे लोकशाहीचा पराभव आहे. ऐतिहासिक परंपरेतून आपल्या भारत देशाची निर्मिती झाली आहे. या देशात निर्माण झालेली सत्ताकेंद्रे वरून निर्माण झाली नसून लोकांच्या अधिकारातून निर्माण झाली आहे. भारत देशातील संविधानाच्या प्रास्ताविकातून न्याय, स्वातंत्र्य, समता या तीन तत्त्वांनी हातात हात घालून आपल्या सगळ्यांना राष्ट्र घडवायचे आहे.”
आपल्या भाषणात ते पुढे म्हणाले की, घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना संविधानाच्या उद्देशिकेतील तुमच्या हृदयाचा जवळ असणारा शब्द कोणता ? असे विचारण्यात आले असता त्यांना बंधुता हा सर्वांत माझ्या हृदयाजवळचा शब्द आणि तोच या
लोकशाहीचे ‘सार,’ आहे असे स्पष्ट केले.
नागरिक या नात्याने न्यायव्यवस्थेची सक्षमता याकडे आपण पाहतो का ? देशाच्या बजेटमध्ये न्यायव्यवस्थेच्या सक्षमीकरणासाठी अर्धा टक्का आर्थिक
तरतूद नाही. राज्यकर्त्यांना प्रश्न विचारण्याची जबाबदारी नागरिकांची आहे. संविधानाचा विचार घराघरांत जायला हवा. आपल्या हक्काच्या पलीकडे जाऊन आपली जबाबदारी म्हणून काय आहे, याकडे नागरिक म्हणून आपण बघायला हवे.
आपल्या भाषणाच्या ओघात त्यांनी संविधानाच्या उद्देशिकेतील सार्वभौम, समाजवादी, लोकशाही, धर्मनिरपेक्ष, बंधुता या संकल्पनेविषयी आपले मत व्यक्त केले.
जगातील सर्वश्रेष्ठ संविधान भारताचे आहे. संविधान १४ डिसें. १९४६ रोजी सभेच्या पहिल्या बैठकीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, ‘ लोकशाही म्हणजे बहुमत नाही. लोकशाही म्हणजे अल्पमताचा आदर करणारे बहुमत,’ आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या केंद्रिय मंत्रिमंडळात तीन विरोधी पक्षांतील नेत्यांना मंत्रीपद देण्यात आले होते. लोकशाही प्रणालीमध्ये विरोधक म्हणजे देशाचा शत्रू, अशी सत्ताधाऱ्यांची भूमिका बनत असल्याबाबत
खंत त्यांनी व्यक्त केली.
छत्रपती शिवाजी महाराजांचे घटनेमधील योगदान काय ? याविषयी बोलताना ते म्हणाले, की मूळ दस्तऐवजावर शिवाजी महाराजांचा फोटो आहे. देशाच्या पाच हजार वर्षांच्या इतिहासात राजेशाही व्यवस्था असताना लोकशाही पद्धतीने राज्य करणारा एकमेव राजा हे शिवाजी महाराज होते. रयतेचा राजा म्हणून त्यांचा उल्लेख करण्यात आला आहे.म्हणून राजा छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आलेले आहे. शिवाजी महाराज यांचे सर्वांत मोठे स्मारक म्हणजे राज्यघटनेमधील फोटो होय.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वसई धर्मप्रांताचे बिशप थॉमस डिसोजा होते. ते म्हणाले, ” भारत हा देश केवळ भौगोलिक प्रदेश नाही, तर विविध भाषा, परंपरा, संस्कृती यांना सामावून घेतलेली मानवी सभ्यता असलेला देश आहे, आणि या विविधतेला आपल्या कवेत घेणारे व्यापक संविधान आहे. आपले संविधान जनता, इतिहास, संघर्षाचे, स्वप्नाचे आशा-आकांक्षाचे प्रतीक आहे. आपल्या संविधानाचा आत्मा समाजवादी, धर्मनिरपेक्ष लोकशाही आहे. आणि प्रत्येक व्यक्तीला न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता याची हमी दिली आहे. या चार शब्दांकडे आपण पाठ्यपुस्तकातील शब्द म्हणून पाहू नये.
ते पुढे म्हणाले की, लोकशाही केवळ मतदानाने मोठी होत नाही. परस्परांच्या संवादाने, एकमेकांची मने समजून घेतल्याने मोठी होते.
संविधान ही प्रक्रिया आहे. त्या प्रक्रियेमध्ये आपण सर्वांनी सामील झाले पाहिजे. संविधानाची खरी परीक्षा न्यायालयात होत नसते, तर नागरिकांच्या दैनंदिन जीवनात, घरात, समाजात होत असते.
प्रास्ताविक करताना ‘सुवार्ता,’ मासिकाचे संपादक फा. जोएल डिकुना म्हणाले, ” मराठी ही केवळ आपल्या चलनाच्या नोटीवरील १८ भाषांपैकी केवळ एक भाषा नव्हे, तर आपणा सर्वांना घडवणारी मायभाषा आहे. मराठीतील ‘ळ’ ही आपल्या मराठीची खरी ओळख आहे. आणि ‘सह हित’, ‘समाजाचे हित’ म्हणजे ‘साहित्य’ होय. या उदात्त हेतूने हा ४५ वा साहित्य मेळावा आहे.” जल-जमीन-जंगल व जीवसृष्टीचे संरक्षण करणे, आवश्यक आहे. म्हणून ‘पर्यावरण परिसंवाद,’ आणि आपल्या देशाच्या ‘संविधानविषयक साक्षरता’ या दोन विषयांवर त्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले.
सुवार्ता साहित्य मेळाव्याची सुरुवात गायक संजीव गोन्सालविस आणि चुळणे गायकवृंद यांच्या साथीने ‘गगन सदन तेजोमय,’ या प्रार्थनागीताने झाली. नंतर मान्यवरांच्या हस्ते वृक्षवाटिकांचे जलसिंचन करून साहित्य मेळाव्याचे उद्घाटन झाले. त्यावेळी ‘बूँद बूँदसे,’ हे प्रार्थनागीत म्हणण्यात आले.
याप्रसंगी ‘पर्यावरण जबाबदारी कुणाची ?’ या विषयावर परिसंवाद (टॉक शो) चे आयोजन करण्यात आले. त्यात ‘ध्यास,’ फाऊंडेशनच्या कीर्ती शेंडे, व्हिस्परिंग ग्रीन फाऊंडेशनच्या जेनिफर डिसिल्वा, पर्यावरणतज्ज्ञ मॅकेन्झी डाबरे यांनी आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे संयोजन लॉना वाझ ह्यांनी केले.
याप्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आला.पसायदानाने सुवार्ता साहित्य मेळाव्याची सांगता झाली.

