दीपक मोहिते,
” भितीचे सावट, ”
भूकंपाच्या घटनामध्ये लक्षणीय वाढ ; डहाणू व तलासरीच्या गावामध्ये भितीचे वातावरण,
पालघर जिल्ह्यातील डहाणू – तलासरी हे तालुके भूकंप प्रवण तालुके म्हणून ओळखले जातात. गेल्या काही वर्षात या परिसरात भूकंपाचे मध्यम स्वरूपाचे ६० ते ७० धक्के बसले.( ३ ते ४.१ रिष्टर ) या भूकंपामुळे या दोन्ही तालुक्यातील सुमारे १ हजार ९२३ घरांना तडे गेले तर काही घरांच्या भिंती कोसळल्या.२०१९ साली झालेल्या भूकंपात घराबाहेर पडताना एका २ वर्षें वयाच्या मुलीचा मृत्यू झाला होता.
गेल्या आठवड्यात म्हणजे २७ सप्टें. रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास ३.६ रिष्टरचा धक्का बसला. या भूकंपाचा केंद्रबिंदू डहाणू तालुक्यातील मोडगाव या गावात होता. त्यापूर्वी पंधरा दिवसात २ धक्के बसले होते. याला वैज्ञानिक भाषेत ” अर्थक्वेक स्वार्म,” असे म्हणतात. स्वार्म म्हणजे शेकडो धक्के एकाच जागी एकाच दिवशी,दररोज, आठवडाभर किंवा महिनाभर चालू राहतात.
पालघर जिल्हा हा देशाच्या भूकंपाच्या नकाशात झोन – ०३ मध्ये येतो. याचा अर्थ असा कि येथे ६ ते ६.५ रिष्टर चा भूकंप होऊ शकतो. १९९३ साली लातूर – किल्लारी येथे झालेला भूकंप हा ६.१ रिष्टरचा होता. हा संपूर्ण परिसर हा दक्खन पठार म्हणून ओळखला जातो. येथे सहसा मोठा भूकंप होत नाही. कोयनाप्रमाणे येथेही भुगर्भात नैसर्गिक हालचाली होत असतात. या परिसरात खाणी व धरणे नाहीत. त्यामुळे मोठ्या भूकंपाची शक्यता नसते.भूकंपाची वाढत्या घटना लक्षात घेऊन सरकारने विविध स्तरावर उपाययोजना केल्या आहेत. त्यामध्ये ग्रामस्थांना हलवण्यासाठी ४२ सुरक्षित स्थळे, १ हजार ३०० तंबूचे वाटप, एनडीआरएफचे पथक तैनात, गावस्तरीय आपत्ती समित्या, पोलीस व रुग्णवाहीका तैनात, याचा त्यामध्ये समावेश आहे.
तसेच स्थानिक प्रशासनातर्फे शिबीरे, मॉक ड्रिल, ऑडिओ मेसेजद्वारे अलर्ट व परिसरात संबंधित विभागाकडून सिस्मोमीटर बसवण्यात आले आहेत. आयआयटी मुंबई यांच्या टीमकडून भूकंपरोधक घरांचे प्रशिक्षण, गवंड्याना रेट्रोफिटिंग शिकवले जाते.
या सर्व गावातील ग्रामस्थ भितीपायी घराबाहेर झोपत असल्यामुळे विंचू व सर्पदंशाचा धोका वाढला आहे. परिसरात वीज खंडित होण्याचे प्रकार सतत वाढत असल्यामुळे ग्रामस्थ सध्या भितीच्या वातावरणात जगत आहेत.
I

