दीपक मोहिते ,
” हल्लाबोल,”
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सत्तासंघर्ष जोमात ; पार्थ पवार विरुद्ध सुनील तटकरे,
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि रायगडचे खा. सुनील तटकरे यांचे राजकीय भवितव्य सध्या धोक्यात आले आहे. हल्ली पक्षातील एक गट त्यांचे पंख कापण्याची एकही संधी सोडत नाही.
अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षाची सर्व सूत्रे आपल्या ताब्यात राहावीत, यासाठी पार्थ पवार सध्या जोमाने कामाला लागले आहेत. रायगडमध्ये भरत गोगावले यांना अदिती तटकरे यांना हटवून पालकमंत्रीपद देण्यासाठी याच गटाने महत्त्वाची भूमिका बजावली, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
जाने. २०२६ मध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला पाठवलेल्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या यादीत ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे या दोघांची नावे नव्हती. तटकरे यांचा उल्लेख फक्त लोकसभेतील नेते म्हणून करण्यात आला होता, प्रदेशाध्यक्षपदाचा साधा उल्लेखही नव्हता. त्यावेळी ही ” टायपिंग मिस्टेक,” असल्याचे सांगण्यात आले, पण ४ महिने उलटूनही त्यामध्ये दुरुस्ती झालेली नाही.
रायगडमधील जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचार पोस्टरवर फक्त तटकरे कुटुंबाचे ( सुनील, अदिती, अनिकेत ) फोटो झळकले, तर अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांचे फोटो गायब होते. यावरून तटकरे गट स्वतंत्र चूल मांडत असल्याचा आरोप त्यांच्यावर झाला होता.
अजितदादांच्या निधनानंतर पार्थ पवार यांना पक्षाची सूत्रे हवी आहेत. त्यांनी तटकरे आणि पटेल यांना दोन हात दूर ठेवले आहे. नुकतेच पार्थ यांना सरचिटणीस आणि जय पवार यांना खजिनदारपद देण्यात आले आहे, तर जुन्या नेत्यांना बाजूला सारले जात आहे.
रायगडच्या पालकमंत्री पदावरून शिवसेना शिंदे गटाचे भरत गोगावले, महेंद्र दळवी आणि महेंद्र थोरवे यांचा तटकरे कुटुंबाला उघड विरोध आहे. अदिती तटकरे यांना पालकमंत्री केल्यापासून हा वाद टोकाला गेला होता.
गेल्या ऑक्टो. २०२५ मध्ये तटकरे यांचे निकटवर्तीय विकास गायकवाड यांनी भरत गोगावले यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला. हा तटकरे यांना मोठा धक्का होता. तर दुसरीकडे शरद पवार यांनी तटकरे यांचे बंधू अनिल तटकरे यांना आपल्या पक्षात घेऊन प्रदेश उपाध्यक्षपद दिले आहे.
लोकसभा २०२४ च्या निवडणुकीत रायगड ही अजित पवार गटाची महाराष्ट्रातील एकमेव जागा होती, जी तटकरे यांनी ८२ हजार ७८४ मतांनी जिंकली होती. पण आता पक्षाची सर्व सूत्रे सुनेत्रा पवार यांच्याकडे गेल्यामुळे तटकरेंच्या राजकीय अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
तटकरेंचा सिल्व्हर ओकवर झालेला अचानक रात्रीचा दौरा आणि शरद पवार यांची भेट यामुळे राष्ट्रवादीमध्ये चर्चांना उधाण आले आहे. खुद्द सुनेत्रा पवार यांनी मे २०२६ मध्ये रायगड दौरा करून तटकरे यांच्यासोबत जुळवून घेण्याचा प्रयत्न केला, पण पक्षात दोन सत्ताकेंद्रे तयार झाल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. रायगडचा गड तटकरेंनी २०१९ आणि २०२४ ला राखला खरा, पण येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत अजित पवार गटाला मोठा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. स्वतःचा गड राखण्यासाठी तटकरे एनडीएमध्येच राहणार असल्याचे वारंवार सांगत आहेत, पण पक्षातील अंतर्गत लढाई त्यांचे वजन दिवसेंदिवस कमी करत आहे.

