दीपक मोहिते,
स्पॉटलाईट, ( भाग क्र.३ )
( एकूण २० भाग )
वसईत शिक्षणाचा प्रसार व्हावा, यासाठी समाजधुरीणानी सर्वस्व झोकून दिले…
वसई तालुक्याची वाटचाल हळुवारपणे काँक्रिटच्या दिशेने सुरु झाली आहे. कृषी उत्पन्न व वनसंपदा यामुळे नावारूपाला आलेल्या या नगरीला हल्ली विकृत स्वरूप येऊ लागले आहे. अल्पावधित सुंदर अशा या ऐतिहासिक नगरीचे बकाल शहरात रूपांतर झाले. शेती, बागायतीना लागणारी खते, बैल, पेंढा, चारा, अवजारे व लाकूड इ. वस्तू खरेदीसाठी आवश्यक असलेले कर्ज घेण्यासाठी शेतकरी सावकार व शेठजीच्या घराचे उंबरठे झिजवू लागले. सावकार कर्ज देताना शेतकऱ्यांच्या जमिनी लिहून घेऊ लागले. आजही अनेक शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर सावकारांची नांवे पाहायला मिळतात. येथूनच तालुक्यातील शेती व बागायतीना घरघर लागली, ती आजतागायत…
दुर्देवाची गोष्ट अशी कि या अस्मानी संकटाला रोखण्यासाठी तत्कालीन लोकप्रतिनिधिनी अक्षम्य दुर्लक्ष केले. त्यांना या स्थित्यतरातील धोके ओळखता आले नाहीत. त्यामुळे अनेक शेतकरी भूमिहीन झाले. कालांतराने हा सावकारी पाश तोडण्यासाठी तालुक्यात सहकारी संस्था व बँका उभ्या राहिल्या. आज सहकार क्षेत्रात अग्रेसर असलेली बसीन कॅथोलीक बँक ही १९१८ साली सहकारी पतसंस्था म्हणून जन्माला आली होती. नंतर तीचे बँकेत रूपांतर झाले. आज हीच बँक तालुक्यातील मध्यमवर्गीयासाठी आशेचा किरण ठरली आहे. त्यानंतर अनेक पतपेढ्या सुरु झाल्या. या सह. बँका व पतसंस्थांच्या माध्यमातून लोकांची गरज भागली व वसईतील सावकारी संपष्ठात आली. या काळात तालुक्यात मोठ्या प्रमाणात निरक्षरता होती, तसेच उद्योगक्षेत्रही बेताचेच होते. अनेक शिक्षणतज्ञ व ख्रिस्ती धर्मगुरु यांनी शाळा सुरु केल्या. त्यामुळे वंचित मुलांच्या शिक्षणाची सोय होऊ शकली. शाळा सुरु झाल्या, पण मुले शाळेत येत नव्हते, त्यामुळे धर्मगुरु गावागावात फिरून मुलांना शाळेत आणत असत. कृषीप्रधान म्हणून ओळख असलेल्या समाजाला शिक्षणाचे महत्व कळावे, यासाठी समाजधुरीणांनी प्रचंड खस्त्या खाल्या.सुमारे ९० वर्षांपूर्वी प्रगत व गतिमान समाजाचे ध्येय उराशी बाळगून लावलेल्या रोपाचे आज वटवृक्षात रूपांतर झाले. अशिक्षित समाजाला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आण्यासाठी फा. मेंडीस, फा. बर्नर्ड भंडारी, फा. फिलिप तवारीस, स. गो. वर्टी, जगन मालोजी निजाई, केशव मास्तर, बळीराम निजाई व अनेक मान्यवरांनी आपले सर्वस्व झोकून दिले. त्याकाळी शिक्षण क्षेत्राकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होता. त्यामध्ये व्यापारीवृत्ती नव्हती तर त्यामध्ये सामाजिक बांधिलकी होती. समाजाचे आपण काहीतरी देणं लागतो, या समर्पित भावनेने या समाजधुरीणानी काम केले. आज अनेक शैक्षणिक संस्था शिक्षणाच्या नावाने गल्लाभरू व्यापार करत आहेत. पूर्वी शाळा या अभावाने दिसायच्या पण आता गल्लोगल्लीत कुत्र्याच्या छत्र्या जशा उगवतात, तशा पाहायला मिळतात. आपल्या पूर्वजानी हाती पैसा व साधनसामुगी नसताना अत्यंत प्रतिकूल परीस्थितीत शिक्षणाचा प्रसार व्हावा, यासाठी केलेली मेहनत समाजासाठी दिशादर्शक ठरली आहे.
( क्रमशः )

