दीपक मोहिते,
” हल्लाबोल, ”
भाजपला गेल्या दीड वर्षात विकासाची व्याख्याच कळली नाही…
वसई विरार शहर महानगरपालिकेच्या तिसऱ्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर वसईच्या राजकारणात एकप्रकारे मरगळ आली आहे. तर दुसरीकडे मतदार देखील ” आपण हे काय करून बसलो, ” अशा अवस्थेत असल्याचे पाहायला मिळत आहे. भाजपकडे पर्याय म्हणून पाहणाऱ्या मतदारांना आता कपाळावर हात मारून घेण्याची पाळी आली आहे. तालुक्यातील वर्षानुवर्षे रखडलेली विकासकामे मार्गी लागावीत यासाठी परिवर्तनाच्या माध्यमातून त्यांनी केलेला प्रयत्न त्यांच्या चांगलाच अंगलट आला आहे. पण आता वेळ निघून गेली आहे. त्यांच्या दिशाहीन कारभारामुळे पुढची चार वर्षे वसईच्या मतदारांना खूप काही भोगायचे आहे.
वसईचा विकास सध्या मृत्यूशय्येवर लोळण घेत आहे. लोकप्रतिनिधी जो काही विकास तुम्हाला – आम्हाला दाखवत आहेत, तो केवळ कागदावरचा विकास आहे. पाणी, आरोग्य, वाहतूक व वैद्यकीय सेवा इ. क्षेत्रात आजही ” जैसे थे, ” स्थिती आहे. महानगरपालिकेच्या महासभेत चार महानगराच्या विकासावर चर्चा होण्याऐवजी सतत दंगा होत असतो. त्यामुळे विकासकामाचा अक्षरशः बट्ट्याबोळ झाला आहे. वसई तालुक्याच्या मतदारांची एक खासियत आहे, ते नवीन लोकप्रतिनिधीना फक्त एकदा डोक्यावर घेतात, दुसऱ्यांदा मात्र ते हमखास पायाखाली घेतात, असा आजवरचा अनुभव आहे. वसईचे माजी आ. हितेंद्र ठाकूर व त्यांचे चिरंजीव नालासोपाऱ्याचे माजी आ. क्षितिज ठाकूर हे दोघे मात्र त्याला अपवाद ठरले. त्यांना वसईच्या मतदारांनी पुन्हा पुन्हा संधी दिली. पण विद्यमान लोकप्रतिनिधीना तशी संधी मतदार देतील, अशी सूतराम शक्यता नाही. कारण, निवडून आल्यानंतर अवघ्या तीन महिन्यात या नव्या नवरीची नवलाई ओसरत गेली. गेल्या दीडवर्षात नजरेत भरेल, असे एकही विकासकाम विद्यमान आमदाररांकडून मार्गी लागू शकले नाही. दुसरीकडे महानरपालिकेत त्यांचे जे काही नगरसेवक निवडून आले आहेत, त्यांनी असा समज करून घेतला आहे कि आपला चेहरा युट्युबवर दिसण्यासाठी सभागृहात दंगा करणे अनिवार्य आहे. या अशा गैरसमजुतीमुळे दर महासभेत तुम्हाला आम्हाला तीन पैश्याचा तमाशा पाहायला मिळतो.अशावेळी महापौर अजीव पाटील जो समंजसपणा व सभ्यता दाखवत असतात, ते नक्कीच कौतुकास्पदच आहे. दुसरीकडे उपमहापौर मार्शल लोपीस हे काय बरळत असतात, त्यांचे त्यांना ठाऊक असावे. दोन दिवसापूर्वी एका युट्युब चॅनेलला मुलाखत देताना ६४ कोटीच्या अपहार प्रकरणी त्यांनी ” फक्त आरोप करू नका, प्रत्यक्ष पुरावे द्या, ” असे वक्तव्य केले. अशा या महाशयाना कोणीतरी सांगायला हवे कि अशा भ्रष्टाचाराला कधीही मायबाप नसतो. भ्रष्टाचार हा कागदावर बेवारस असतो. त्यांना कोणीतरी सांगायला हवे कि अशी बेताल वक्तव्ये करून व रस्त्याची कामे सुरु असताना उभे राहून सेल्फी काढणे म्हणजे उपमहापौर पदाची गरिमा घालवण्यासारखे आहे. महापौर अजीव पाटील यांनी त्याना आवरायला हवे. अलीकडच्या काळात अशा लोकांच्या तोंडासमोर बूम घेऊन उभे राहणाऱ्या तथाकथित पत्रकारांचा वेलू गगनावर गेला आहे. त्यामुळे पदावर असलेल्या प्रत्येक लोकप्रतिनिधीने मुलाखती देताना तारतम्य बाळगले पाहिजे.

