दीपक मोहिते,
सामाजिक बांधिलकी,
अर्नाळा समुद्रकिनारी विद्यार्थ्यांकडून स्वच्छता मोहीम,
गणपती विसर्जनानंतर मोठ्या प्रमाणावर निर्माल्य जमा होते सामाजिक बांधिलकीचे भान राखत अर्नाळा समुद्रकिनाऱ्यावर जमा झालेला कचरा आणि निर्माल्याची स्वच्छता करण्यासाठी विवा महाविद्यालय आयक्यूएसी, डीएलएलई, विज्ञान विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने २६ सप्टें. २०२६ रोजी अर्नाळा समुद्रकिनारा स्वच्छता मोहीम राबवली. या मोहिमेला मुक्ता एज्युकेशन ट्रस्ट, विरार (पश्चिम ) आणि वसई-विरार शहर महानगरपालिका यांचे सहकार्य लाभले. अर्नाळा ग्रामपंचायतीचे सरपंच नंदकुमार घरत, मुंबई पोलीस तसेच अर्नाळा सोशल वेल्फेअर असोसिएशन सदस्य प्रदीप सालीयन, स्वच्छता दूत निनाद पाटील, वसई-विरार शहर महानगरपालिका घनकचरा विभागाचे मुख्य आरोग्य निरीक्षक निलेश जाधव, कनिष्ठ आरोग्य निरीक्षक संजय सावंत यांनी या मोहिमेत सहभागी होवून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या मोहिमेत प्राध्यापक प्रतिनिधी म्हणून वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख वैभव सातवी , प्राणीशास्त्र विभाग प्रमुख सोनल साळवी, रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ. आरती दुबे उपस्थित होते. या मोहीमेचे नियोजन आयक्यूएसी सह समन्वयक डॉ. अनुश्री किणी यांच्या मार्गदर्शनाखाली कऱण्यात आले. सकाळी ८.०० ते ११.०० या वेळेत झालेल्या या मोहिमेत तब्बल १६७ विद्यार्थी आणि ११ प्राध्यापक सहभागी झाले होते.
२५ सप्टें. रोजी झालेल्या गणपती विसर्जनानंतर समुद्रकिनाऱ्यावर मोठ्याप्रमाणात साचलेला कचरा दूर करून किनारपट्टी स्वच्छ ठेवणे, तसेच विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाबाबत जागरूकता निर्माण करणे, हा या मोहिमेचा प्रमुख उद्देश होता. या मोहिमेदरम्यान विद्यार्थ्यांनी समुद्रकिनाऱ्यावरील कचरा गोळा करून त्याचे वर्गीकरण केले. सागरी व किनारी प्रदूषण, कचरा व्यवस्थापन आणि पर्यावरणीय शाश्वतता यांसारख्या विषयांचा विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष अनुभव घेतला. पर्यावरण संरक्षण, ही केवळ शासनाची किंवा प्रशासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे, हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. ‘स्वच्छ किनारा, निरोगी पर्यावरण’ या संदेशातून राबवण्यात आलेली ही मोहीम विद्यार्थ्यांसाठी अनुभवाधारित शिक्षणाचे प्रभावी माध्यम ठरले.

