दीपक मोहिते,
” स्पॉटलाईट,”
भाग क्र. २, ( एकूण २० भाग )
असा विकास व बदल कोणच्याही नशिबी येऊ नये,
कालच्या भागात आपण वसई तालुक्यातीला शेती व बागायती विषयी थोडक्यात आढावा घेतला.आता या भागात नागरिकरणासाठी जमिनी मोकळ्या करण्याचा राज्य शासनाचा निर्णय स्थानिक भूमिपुत्राच्या मुळावर कसा आला, याविषयी सविस्तर माहिती घेऊ या.
५० वर्षांपूर्वी या परिसरातील लोकसंख्या वाढीचा वेग व घनता खूप कमी होती. थोडीफार लोकसंख्या वाढली ती रेल्वे स्थानक परिसरात, त्यावेळी येथे जन्मदराचा वेग कमी होता. त्यामुळे लोकवस्ती विरळ होती. आर्थिक आवक कमी होती, पण स्थानिक भूमिपुत्र समाधानी होते. विकासाची जी काही कामे होत असत, ती ग्रामपंचायतीच्या माध्यमातून, ” आर्थिकदृष्ट्या कमकुवत, ” अशी त्यांची ओळख होती. त्यामुळे त्या काळात विकासकामे करताना मर्यादा येत असत. चालायला धड रस्ते नव्हते, प्यायला पाणी नव्हते व इतर पायाभूत सोयी – सुविधाचा अक्षरशः दुष्काळ होता. अशा परिस्थितीमध्ये राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री व जाणता राजा अशी ओळख असलेल्या शरद पवार यांची येथील जमिनीवर वाकडी नजर पडली व वसईकरांच्या जमिनी व भवितव्यावर अस्मानी संकट कोसळले. पण पवार यांच्या सरकारला वसईकरांच्या दुःखाशी काही देणे घेणे नव्हते. शंकरराव चव्हाण वगळता प्रत्येक मुख्यमंत्र्यांनी या तालुक्याला घातक ठरतील, असे निर्णय घेतले. ज्या शंकराराव चव्हाण यांनी आपल्या कारकिर्दीला कधीही डाग लागू दिला नाही, त्यांचे चिरंजीव अशोक चव्हाण यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात कसे दिवे लावले, हे सर्वश्रुत आहे. नालासोपारास्थित वाघोली गावात पोलिसांनी स्थानिकावर जे अत्याचार केले, त्या घटनेने जालीयनवाला बाग हत्याकांडाची आपल्याला आठवण करून दिली. पोलिसांनी हे अत्याचार का केले व त्यामागची कारणे काय होती, ते पुढच्या काही भागात आपल्याला वाचायला मिळणार आहे.
सन १९५८ मध्ये मुंबई ग्रामपंचायत अधिनियम लागू झाला व तालुक्यात ७२ ग्रामपंचायती स्थापन झाल्या व स्थानिक स्वराज्य संस्थाच्या माध्यमातून विकासकामाना सुरुवात झाली. पण वाढत्या नागरिकरणाच्या तुलनेत त्या तुटपुंज्या ठरल्या. स्थानिक भूमिपुत्र मात्र समाधानी होता. भल्या पहाटे उठून आपली फुले व भाजीपाला दादरच्या बाजारात नेवून विक्री करणारे शेतकरी आर्थिक आवक कमी असली तरी समाधानाने जगत होते.
शेती, बागायती, दूध, केळी, मोगरा, कागडा, विड्याची पाने, मुठेळी आदी कृषी उत्पादनाचा त्यामध्ये समावेश असायचा. त्याकाळी वसईची विड्याची पाने नेण्यासाठी फ्रँटियर मेल व डेहराडून या नावाजलेल्या गाड्या वसईला थांबत असत. आता काळाच्या ओघात हे सारे काही नाहीसे झाले आहे. आता शेती / बागायतीच्या जागी अनधिकृत बांधकामे, खड्ड्यानी ओतप्रोत भरलेले रस्ते, उखडलेले डांबर व टँकरचा सर्वत्र सुळसुळाट सर्वत्र पाहायला मिळतात. बदल हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे, हे जरी खरं असले तरी अशाप्रकारचा बदल कोणाच्याही नशिबी नको, असे वसईकरांचे म्हणणे आहे.
( क्रमशः )

