दीपक मोहिते,
पोषणासोबत महिलांना कायदेविषयक मार्गदर्शन,
एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प पालघरअंतर्गत तारापूर-२ विभागात पोषण महाअभियानाच्या निमित्ताने पोषण मेळावा तसेच पंचायतराज संस्थांमधील महिलांसाठी कायदेविषयक प्रशिक्षणाचे आयोजन नुकतेच हनुमान नगर ग्रामपंचायत सभागृहात करण्यात आले होते.महिलांचे पोषण, आरोग्य, कायदेविषयक अधिकार आणि बालकांच्या सर्वांगीण विकासाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने आयोजित या उपक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्हा परिषद माजी अध्यक्षा तथा महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोगाच्या अध्यक्षा वैदेही वाढाण, माजी जिल्हा परिषद सदस्य भावना विचारे, सरपंच गुलाब खरपडे, उपसरपंच यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मेळावा पार पडला.
या कार्यक्रमाचे आयोजन बालविकास प्रकल्प अधिकारी अमोल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
यावेळी वैदेही वाढाण यांनी पोषण अभियानाच्या विविध संकल्पना व त्यामागील उद्देश स्पष्ट करताना महिलांनी आणि किशोरवयीन मुला-मुलींनी पोषणाकडे गांभीर्याने पाहण्याचे आवाहन केले. आदिवासी समाजासाठी असलेले कायदे व त्यातील तरतुदी, मुला-मुलींचे शासनाने निर्धारित केलेले विवाहाचे वय तसेच त्यापूर्वी विवाह झाल्यास होणारे शारीरिक दुष्परिणाम याविषयी मार्गदर्शन केले. समाजातील रूढी-परंपरांचा विचार करताना मुला-मुलींच्या आरोग्याला आणि भवितव्याला प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
तर भावना विचारे यांनी अंगणवाडी आणि जिल्हा परिषद शाळेतील बालकांना ‘चांगला स्पर्श,’ आणि ‘वाईट स्पर्श,’ याबाबत योग्य पद्धतीने माहिती देण्याच्या गरजेवर भर दिला. पालक, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी बालकांना समजेल अशा पद्धतीने प्रत्यक्ष कृतीतून ही माहिती देण्याचे त्यांनी सांगितले. मुला-मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व, महिलांसाठी असलेले विविध कायदे तसेच केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी अंगणवाडी सेविकांनी आपल्या कार्यक्षेत्रातील योजनांची अद्ययावत माहिती घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.
कार्यक्रमात वकिलांमार्फत हुंडा प्रतिबंधक कायदा, वारसा हक्क कायदा, महिलांवरील हिंसाचार प्रतिबंधक कायदा, कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण कायदा चाइल्ड हेल्पलाइन तसेच महिलांसाठी उपलब्ध हेल्पलाइन याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. कायद्याने महिलांना दिलेले अधिकार, त्यांचे संरक्षण आणि अडचणीच्या प्रसंगी उपलब्ध असलेल्या कायदेशीर मदतीची माहिती यावेळी देण्यात आली. कार्यक्रमादरम्यान उपस्थित महिलांना कायदेविषयक पुस्तकांचेही वाटप करण्यात आले.
पोषण मेळाव्यात ‘ पहिले १००० दिवस,’ हे बालकाच्या वाढीसाठी आणि विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगत बालक व मातांच्या आहारातील पोषणमूल्यांचे महत्त्व स्पष्ट करण्यात आले. अॅनिमिया प्रतिबंध, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना तसेच किशोरवयीन मुला-मुलींनी नियमितपणे पोषणमूल्ययुक्त आहार घेण्याबाबत पर्यवेक्षिका रत्नमाला गायकवाड यांनी मार्गदर्शन केले. महिलांसाठी पाककृती स्पर्धा, रांगोळी स्पर्धा आणि सुदृढ बालक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. स्पर्धेतील विजेत्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरवण्यात आले.
यावेळी ग्रामविकास अधिकारी निमिषा संखे, अॅड. अनिता गावित, मोनाली पाटील, ज्योती होळकर, दीपा महाले, पर्यवेक्षिका रत्नमाला गायकवाड यांच्यासह अंगणवाडी सेविका व मदतनीस उपस्थित होत्या.

