दीपक मोहिते,
” स्पॉटलाईट,” भाग क्र. १
एकूण २० भाग,
ऐतिहासिक वसई नगरीची अवघ्या काही वर्षात वाताहात झाली…
पालघर जिल्ह्यातील नालासोपारा शहराला ऐतिहासिक शूर्पारक नगरी नांव देणे व वसई तालुक्याच्या सीमेवर प्रवेशद्वार उभारणे, असे दोन प्रस्ताव महानगरपालिकेतील सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या विचाराधीन असल्याचे कळले. गेल्या पाच दशकाच्या काळात या ऐतिहासिक नगरीमध्ये ज्या काही उलथापालथी घडल्या, त्याचा मी एक सर्वसामान्य साक्षीदार आहे. त्यामुळे माझे मन ५० वर्षांपूर्वीच्या त्या निसर्गरम्य, शैक्षणिक, सामाजिक अशी ओळख असलेल्या ऐतिहासिक नगरीमध्ये हिंडू लागले. या काळात जी काही स्थित्यतरे घडली,त्याचा मागोवा घेण्याचे माझ्या मनाने ठरवले व हा लेखप्रपंच मी सुरु केला.नव्या पिढीला आपली जुनी व ऐतिहासिक वसई नगरी कशी होती व ती काळानुरूप कशी बदलत गेली, यासाठी हा अट्टाहास…
भूतकाळात डोकावून बघताना माझ्या डोळ्यासमोर असलेली पूर्वीची अवखळ वसई खाडी ते वैतरणा व अरबी समुद्र ते तुंगारेश्वरच्या पर्वतरांगा व घनदाट जंगल या दरम्यान सुमारे ३८ हजार चौ. हेक्टर क्षेत्रात ही ऐतिहासिक नगरी वसली होती. पूर्वी शेती, बागायती यांनी नटलेल्या या तालुक्यात १९७० च्या दशकात अचानक नागरिकरणाला वेग आला. त्यानंतरच्या दहा वर्षात राज्य सरकारने हजारो हेक्टर जमिनी नागरिकरणासाठी मोकळ्या केल्या. तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी या ऐतिहासिक कामात मोलाची कामगिरी बजावली व येथून या नगरीची वाताहात सुरु झाली, ती आजतागायत सुरूच आहे. नागरी सोयी सुविधाचा प्रचंड अभाव असताना आपले मायबाप सरकार वसईकर नागरिकांच्या जीवावर उठले. त्यांचे दुष्परिणाम आपण आजही भोगत आहोत. सरकारच्या या निर्णयाला हरित वसई संरक्षण समिती या सामाजिक संघटनेने प्रचंड विरोध केला. पण सत्तेपुढे सर्वसामान्य माणसाचे काहीही चालत नाही. अनेक आंदोलने झाली, हजारो नागरिकांचे मोर्चे निघाले, पण सरकारने आपला हट्टीपणा सोडला नाही. आणि बघता बघता हरित वसईचा हरितपणा नष्ट होत गेला. पूर्वी बैल जोडून राहाट्याच्या पाण्यावर बागायती व हाती शेतीची अवजारे घेऊन ग्रामीण भागातील शेतकरी स्वकष्टाने शेती करायचे, आता ते दृष्य कुठेच पाहायला मिळत नाही. प्रवासासाठी बैलगाडी, टांगे व एसटी ही वाहने होती. गुरांना पाणी देण्यासाठी गावागावात बावखले होती, ती जमिनीच्या पोटात कधी लुप्त झाली, ते स्थानिक भूमिपुत्रांना कळले देखील नाही. त्याकाळी संपूर्ण तालुक्याची लोकसंख्या १९७० मध्ये ( शहरी व ग्रामीण भाग ) १ लाख ८०
हजार इतकी होती. आज ती १४ ते १५ लाखाच्या घरात पोहोचली आहे. कौलारू घरे, टूमदार छोटेखानी बंगले व आदिवासी समाजाची कुडाची घरे, अशी वसईची ओळख होती, ती वसई आता नागरिकरणाच्या पोटात लुप्त झाली आहे.
क्रमशः

