दीपक मोहिते,
केल्याने पर्यटन…
कोकण कात टाकतोय, फक्त स्थानिकांचे पाठबळ हवे,
गेल्या अनेक दशकापासून कोकण परिसर कसा निसर्गसुंदर आहे. बागायती, शेती व मासेमारी या तीन व्यवसायानी कोकणी माणसाला आर्थिकदृष्ट्या कसे समृद्ध केले, याविषयी आपण आजवर अनेक सुरस कथा ऐकत आलो. उत्कृष्ठ हवामान, मुबलक पाऊस व ७२० कि.मी. लांबीचा विशाल समुद्रकिनारा व त्याला लागून असलेल्या नारळी – पोफळीच्या बागा, पण अलीकडच्या काळात या परिसरातील तरुण रोजगाराच्या निमित्ताने मुंबईला स्थलांतरीत होऊ लागले व येथील सौंदर्य काळवंडले गेले. गावच्या गावे ओस पडली. ज्या घरामध्ये माणसांची जत्रा बघायला मिळायची, त्या घरात फक्त वृद्धापकाळाकडे झुकलेले आई वडील निवृत्तीचे जीवन जगत आहेत. होळी, गणपती व गावातील जत्रा अशा सणाच्या दरम्यान मुले, त्यांच्या बायका व मुले यांचा गावाच्या घरात वावर होऊ लागला. वृद्ध आई वडील या सणांची व गावातील जत्रेची आतुरतेने वाट पाहू लागली. रोजगार व आर्थिक विकास अशा दोन कारणामुळे कोकणातील गावे ओस पडत गेली. तरीही कोकणी माणसाला कोकण हा परिसर कधीही परका झाला नाही.
पण आज कोकणाला पर्यटनवाढीची नितांत गरज आहे. हापूस आंबा, काजू, नारळ, भात व मासेमारी व्यवसायावर अवलंबुन असलेला कोकण, आता परिसराला आर्थिक बळकटी देऊ शकत नाही, हे सरकारच्या लक्षात आले व त्यांनी आता पर्यटनातून प्रत्यक्ष रोजगार निर्मितीचे प्रयत्न चालवले आहेत. रिसॉर्ट्स, गाईड, बोट ऑपरेटर, स्कुबा ट्रेनर, होमस्टे, रेस्टॉरंट, हस्तकला व वारली पेंटिंग,) याचा त्यामध्ये समावेश आहे.
कोकण परिसरात गोव्यापेक्षा स्वच्छ व कमी गर्दीचे समुद्रकिनारे तारकर्ली, मालवण, देवगड, गुहागर व श्रीवर्धन, छत्रपती शिवाजी महाराजांचे जलदुर्ग, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, जंजिरा,डॉल्फिन सफारी, स्कुबा डायव्हिंग, हॉट वॉटर स्प्रिंग, धबधबे व जैवविविधता, याचा त्यामध्ये समावेश आहे.त्यासाठी सरकारने विविध योजना आखल्या आहेत.
१ ) सिंधुरत्न समृद्ध योजना : ही योजना ३१ मार्च २०२५ रोजी संपली होती. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योजनेला ३ वर्षासाठी मुदतवाढ दिली.यामध्ये कृषी, फालोत्पादन, पशुधन, मत्स्य, पर्यटन, लहान बंदरे, सूक्ष्म उद्योग व कौशल्य विकास समाविष्ट आहेत.
२ ) बीच शॅक पॉलिसी ( गोवा मॉडेल ) : गुहागर, आरेवारे ( रत्नागिरी ) , कुणकेश्वर, तारकर्ली ( सिंधुदुर्ग ) वरसोली, दिवेआगर ( रायगड ) केळवे / बोर्डी ( पालघर ):येथे तात्पुरते शॅक, यातून ८० % रोजगार स्थानिकांसाठी राखीव,
३ ) ब्ल्यू फ्लॅग बीच : ( २० कोटींचा निधी ) नागाव, श्रीवर्धन ( रायगड ) गुहागर, लाडघर ( रत्नागिरी ) व पर्णका ( पालघर ) या समुद्रकिनाऱ्यांना ब्ल्यू फ्लॅग पायलट दर्जा, येथे जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करण्यासाठी आर्थिक निधीचे नियोजन, वॉच टॉवर, चेंजिंग रूम व शौचालय,
४ ) कोकण ग्रामीण पर्यटन विकास कार्यक्रम : कर्दे गाव, ता. दापोली, १४.०२ कोटींचा निधी मंजूर,
५ ) वेंगुर्ले – शिरोडा यवेळागर येथे ताज हॉटेल, तिघांमध्ये त्रिपक्षीय करार, सदर प्रकल्पाच्या माध्यमातून स्थानिकांना रोजगार व शेतकऱ्यांना
सानुग्रह अनुदान,
६ ) एक राज्य व एक लक्ष्य : सिंधुदुर्ग जिल्ह्याला एकात्मिक पर्यटन सर्किट म्हणून विकसित करणे, इन्फ्रास्ट्रक्चर, डिजिटल प्रमोशन व समुदाय सहभाग,होम स्टे, ऍग्रो टुरिझम, मत्स्य अर्थव्यवस्था व अन्य बरेच काही…
कोकणात जर या माध्यमातून रोजगार निर्मिती झाल्यास शहराकडे जाणारा तरुणांचा लोंढा नक्की कमी होऊ शकतो व कोकणातील ओस पडलेली घरे पुन्हा गजबजु शकतात.मात्र सरकारच्या या प्रयत्नाना स्थानिक लोकांचे पाठबळ मिळणे आवश्यक आहे.

