दीपक मोहिते,
परिवहन समिती सदस्यानो ” लगे रहो, ”
वसई विरार शहर महानगरपालिकेच्या परिवहन समितीवर निवडून आल्याच्या जाहिराती व माध्यमावरील पोस्ट पाहून वसई विरार शहरातील नागरिकांना गेल्या काही दिवसात आश्चर्याचे सुखद धक्के बसले. सर्वप्रथम या समितीवर निवडणुका होतात कि नियुक्त्या ? हे समजून घेणे गरजेचे आहे. वास्तविक या संविधानिक आधार नसलेल्या समितीवर सत्ताधारी पक्ष आपल्या मर्जीतील लोकांच्या नियुक्त्या करत असतो.पण अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले हे सदस्य जाहिराती व पोस्ट टाकून आपली पाठ थोपटून घेत असतात. समितीच्या बैठका या केवळ चहा व बिस्किटे खाण्यापूरत्या असतात.
पण कोणताही अधिकार नसलेल्या या समितीचे सदस्य नियुक्त्या झाल्यानंतर मात्र सहस्त्र हत्तीचे बळ संचारल्यासारखे फिरू लागतात. या सदस्यांना संविधानिक अधिकार असते तर गेल्या बारा वर्षात परिवहन सेवेची इतकी दुर्दशा झाली नसती. कार्यकर्त्यांना खुश ठेवण्यासाठी अशाप्रकारची सोय करण्यात येत असते. त्यामुळे परिवहन सेवा चालवणारा ठेकेदार या स्वयंभू सदस्यांना काडीचीही किंमत देत नाही. ही समिती बरखास्त झाली कि हे सदस्य आपण जिवंत असेपर्यंत ” मा. सदस्य परिवहन समिती, ” लिहायला मोकळा होतो. मा. म्हणजे ” माजी,” पण हे सदस्य मा. म्हणजे ” माननीय, ” असे भासवण्यात धन्यता मानतात. प्रथम महापौर, प्रथम महिला महापौर व प्रथम खासदार, ही तिन्ही पदे यापूर्वी कधीच ऐकायला मिळत नव्हती, ती अलीकडच्या काळात तथाकथित नेत्यांनी निर्माण केली ते केवळ स्वतःच्या समाधानासाठी..
पण, लोक पण आता राजकीय नेत्यांच्या चाली ओळखू लागल्या आहेत. या सदस्यांना अधिकार असते तर पार रसातळाला गेलेल्या परिवहन सेवेला उर्जीतावस्था आली असती आणि नागरिकांनी त्यांना दुवा दिले असते,
चलता है.. या मंडळींना आनंद मिळतो, त्यामध्ये नागरिकानाही समाधान आहे. त्यामुळे त्यांचे एकच म्हणणे आहे,” लगे रहो मुन्नाभाई, “

