दीपक मोहिते,
हल्लाबोल
तीन पैश्याचा तमाशा बंद करा…
वसई विरार शहर महानगरपालिकेच्या प्रत्येक महासभेत जो तीन पैश्याचा तमाशा करदात्यांना पाहायला मिळतो, त्याचा अक्षरशः उबग आला आहे. सत्ताधारी व विरोधी पक्षाचे नगरसेवक, हे सार्वजनिक नळावर भांडणाऱ्या महिलासारख्या भांडत असतात. त्यांच्या या भांडणाशी करदात्यांना कोणतेही देणेघेणे नाही. आमच्यावर लादण्यात आलेली भरमसाठ करवाढ, शहरातील अस्वच्छता, अपुरा पाणीपुरवठा, पैश्याची उधळपट्टी व वर्षानुवर्षे रखडलेली विकासकामे या अशा संवेदनशील विषयी हे दोन्ही पक्ष चकार शब्द बोलत नाहीत, हे खऱ्या अर्थाने करदात्यांचे दुःख आहे. या महानगरपालिकेला तब्बल १६ वर्षे होत आली, पण ही महानगरपालिका अद्याप कुपोषितच आहे. अधिकारी व लोकप्रतिनिधी हे सुदृढ बालक स्पर्धेत भाग घेऊ शकतील, इतपत धुष्टपुष्ट झाले आहेत. त्यांच्या श्रीमंतीचा वेलू केंव्हाच गगनावर गेला आहे. पण महानगरपालिका व करदात्यांचे काय ? अधिकारीवर्ग महानगरपालिकेचे लचके तोडणाऱ्या लांडग्याच्या भूमिकेत आहेत तर दुसरीकडे नगरसेवक हे टक्केवारीच्या स्वप्नरंजनात गुंग आहेत. अशावेळी अतिशय बदनाम शहर म्हणून ज्या नालासोपारा शहराचे नांव महाराष्ट्राच्या कानकोपऱ्यात दुमदुमत आहे, त्या शहराचे शूर्पारकनगरी असे नामांतर करण्याचा अट्टाहास करण्यात येत आहे. वास्तविक या ऐतिहासिक नगरीतील रयत दैनंदिन गरजापासून ( पाणी, आरोग्य, चांगले रस्ते व स्वच्छता ) वंचित असताना लोकप्रतिनिधिनी गेल्या काही वर्षात बकाल केलेल्या या शहराचे नांव बदलून नेमके काय साध्य करणार आहे ? कळायला मार्ग नाही. दर महिन्याला होणाऱ्या महासभेत हे दोन्ही पक्ष क्षेत्रविकासावर किती चर्चा करतात, हा एक संशोधनाचा विषय आहे. तर दुसरीकडे वसुली या विषयाला नगरसेवक सर्वोच्च प्राधान्य देऊ लागले आहेत. त्यासाठी ते सध्या एकमेकांच्या उरावर बसू लागले आहेत. कोण बाजारकरात हात धुतोय, तर कोण फेरीवाल्याना पिडतोय तर कोण बाहेरगावावरून येणाऱ्या बसवाल्याकडून पार्किंगच्या नावाखाली लूट करतोय, हे असे दूष्टचक्र गेली अनेक वर्षे सुरु आहे. नव्याने निवडून आलेले नगरसेवक ” तुम्ही बिघडलात, आता आम्हीही बिघडून पाहतो, ” असा सूर आळवत आहेत.तर जुने ” आमच्या ताटात दुसरा वाटेकरी बिलकुल नको, ” म्हणून रणनिती आखण्यात दंग आहेत. या सर्व गदारोळात प्रामाणिकपणे कर भरणारे करदाते मात्र हालअपेष्टा सहन करत जगत आहेत.

