दीपक मोहिते,
आपल्या देशात पर्यटनवाढीसाठी चांगले वातावरण,
आज २७ सप्टें. २०२६ रोजी जागतिक पर्यटन दिन साजरा करण्यात येत आहे. दरवर्षी २७ सप्टेंबर हा दिवस जगभरात ” जागतिक पर्यटन दिन, ” म्हणून साजरा केला जातो. यंदाच्या जागतिक पर्यटन दिनाची थीम ” डिजिटल अजेंडा आणि आर्टिफिशिअल इंटेलिजन्स द्वारे पर्यटनाची पुनर्रचना,” अशी आहे. याद्वारे पर्यटन क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर वाढवून ते अधिक सोपे आणि शाश्वत बनवण्यावर भर देण्यात येत आहे. यंदा मुख्य जागतिक कार्यक्रमांचे यजमानपद एल साल्वाडोर या देशाला देण्यात आले आहे.
१९८० पासून संयुक्त राष्ट्राच्या जागतिक पर्यटन संघटनेने ( युएनडब्ल्यूटीओ ) या दिनाची सुरुवात केली. १९७० मध्ये या संघटनेच्या कायद्याला मंजुरी मिळाली होती, म्हणून हा दिवस जागतिक पर्यटन दिन म्हणून साजरा केला जातो.
जगभरातील प्रत्येक देशाच्या अर्थव्यवस्थेत पर्यटनाला महत्वाचे स्थान आहे. भारताच्या जीडीपी मध्ये पर्यटनाचा ५.२८ % वाटा आहे. या व्यवसायात सुमारे ९.४४ कोटी लोकांना प्रत्यक्ष व प्रत्यक्षपणे रोजगार उपलब्ध होतो. २०२५ च्या आर्थिक वर्षात पर्यटकांची संख्या ४३२ कोटी इतकी होती. त्यामध्ये ३.२५ कोटी परदेशी पर्यटक होते. या पर्यटकाकडून देशाला ३ लाख कोटी रु. चे परकीय चलन मिळाले. पर्यटन म्हणजे केवळ भटकंती नाही, तर स्थानिक अर्थव्यवस्था, संस्कृती व रोजगाराचा कणा आहे. आपल्या राज्यात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून पर्यटन विषयक कामकाज हाताळण्यात येते. या क्षेत्रात आता शेतकरी व बेरोजगार तरुण उतरले असून कृषी पर्यटन, व्हर्च्युअल फार्म टूर या नव्या संकल्पना आकाराला येत आहेत. आपल्या सरकारने यंदा आजपासून ते ३ ऑक्टो. पर्यंत किल्ले संवर्धन, स्वच्छता मोहीम, सायकल रॅली, फूड फेस्टिवल, असे उपक्रम राबवण्याचे ठरवले आहे.
सहा वर्षांपूर्वी आलेल्या कोरोनामुळे पर्यटन व्यवसायाचे प्रचंड नुकसान झाले होते. जवळपास सर्वच देशाच्या अर्थव्यवस्था पार विस्कळीत झाल्या. आजही त्या आपत्तीमधून अनेक देश सावरले नाहीत.आपले राज्य हे पर्यटन क्षेत्रात अव्वल क्रमांकावर आहे, कारण राज्य हे पर्यटनस्थळानी समृद्ध असे आहे. केंद्र सरकारने पर्यटन वाढीसाठी विविध योजना आखल्या आहेत. महाविद्यालयीन शिक्षणामध्ये ” पर्यटन व्यवस्थापन व नियोजन, ” या अभ्यासक्रमाचा समावेश केला आहे.अनेक कंपन्या या क्षेत्रात मोठ्याप्रमाणात गुंतवणूक करत आहेत.त्यामुळे आज अनेक तरुण ” ट्रॅव्हल व टुरिझम,” विषय घेऊन पदवीधर होत आहेत. पर्यटन क्षेत्र हे निवास, वाहतूक, अन्न, इव्हेन्ट्स व साहसी पर्यटन इ. सेवा देणारे क्षेत्र ठरले आहे. यामाध्यमातून गाईड, टूर ऑपरेटर्स यांना रोजगार मिळतोच, पण अनेक तरुण स्वतःच्या ट्रॅव्हल्स एजन्सी सुरु करू शकले.त्यामुळे हे क्षेत्र अधिक प्रमाणात विकसित व्हावे, यासाठी केंद्र व राज्य सरकार या दोघांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. मुंबईच्या वेशीवर असलेल्या पालघर जिल्ह्यात पर्यटनाला चांगला वाव आहे. निसर्गसुंदर समुद्रकिनारा, शेती /बागायती, मोठ्या संख्येने असलेले गडकिल्ले, रिसॉर्ट्स, मासेमारी व्यवसाय, मंदिरे, चर्चेस व आदिवासी संस्कृती आदी पर्यटनस्थळे पर्यटकाना खुणावत असतात.त्यामुळे पर्यटन विकास महामंडळाने पर्यटनाला अधिक चालना मिळावी, यासाठी प्रयत्न करायला हवेत. पण ही दोन्ही सरकारे अलीकडच्या काळात या जिल्ह्यावर अनेक विनाशकारी प्रकल्प लादत आहेत. सरकार एकीकडे पर्यटनवाढीसाठी प्रयत्नशील असल्याचे भासवत आहे तर दुसरीकडे या जिल्ह्याला लागून असलेल्या निसर्गसुंदर समुद्रकिनाऱ्याला उध्वस्त करु पाहत आहे.

