दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
महानगरपालिकेत ” लुटालूट,” हा एकमेव कार्यक्रम सुरू आहे…🤦♂️🤦♂️
वसई विरार शहर महानगरपालिका गेल्या अनेक वर्षांपासून विविध भानगडीमुळे चांगलीच प्रकाशझोतात आली आहे. गेली सतरा वर्षे या महानगरपालिकेत विरोधी पक्ष नावापुरता होता. त्यामुळे सत्ताधारी पक्षाला मनमानी कारभार करता आला. पण गेल्या निवडणुकीत भाजपने ४४ जागा जिंकल्या व विरोधी पक्ष म्हणून सूत्रे हाती घेतली व विरोधी पक्षाने राखणदाराची भूमिका यशस्वीपणे राबवण्यास सुरुवात केली. त्यामुळे अनेक आर्थिक घोटाळे लोकांसमोर येऊ शकले. भाजपच्या आक्रमक पवित्र्यामुळे सत्ताधारी पक्षाला अनेकदा माघार घ्यावी लागली. माध्यमाचा बेमालूम वापर करत भाजपच्या लोकांनी आजवर कधीही बाहेर न आलेले आर्थिक घोटाळे चव्हाट्यावर आणले.
आजच्या घडीला भाजपला रोखणे, सत्ताधारी बहुजन विकास आघाडीला अशक्य होत असलेले पाहायला मिळत आहे. महानगरपालिकेची प्रत्येक महासभा व स्थायी समितीची सभा गोंधळाशिवाय पार पडत नाही. महानगरपालिकेत भाजप व बाहेर वसई जनशक्ती आघाडी,अशा कात्रीत सत्ताधारी व मनपाचे अधिकारी अडकले आहेत. विरोधी पक्ष नेते मनोज पाटील यांच्या आक्रमकतेपुढे सत्ताधारी व अधिकारी वर्ग हतबल झाल्याचे पाहायला मिळत आहे. ज्या लोकांना महानगरपालिकेचे पाणी मिळत नाही, त्यांनाही पाण्याची देयके देण्याचा महाप्रताप मनपा प्रशासनाने केला. याप्रकरणी सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकाने घरचा आहेर दिला. अशाप्रकारचा तुघलकी कारभार याच महानगरपालिकेत पाहायला मिळतो. गेली अनेक वर्षे जलवाहिनी अंथरण्यासाठी अनेकदा भूमिपूजने झाल्याचे तसेच वर्षानुवर्षे पाण्याच्या प्रतिक्षेत असलेल्या पाण्याच्या उंच टाक्या वसईच्या करदात्यांनी पाहिल्या, आज त्या टाक्याची दुर्दशा झाली आहे.पाण्याचा पत्ता नाही,पण पाण्याची दरवाढ मात्र करदात्यांच्या माथी बसत असते. हे फक्त याच महानगरपालिकेत अनुभवायला मिळते. सत्ताधारी पक्ष व अधिकारी हे कचरा,रस्ते/गटारे बांधणी व नालेसफाईमध्ये अधिक रस दाखवत असतात.त्यामुळे महानगरपालिकेच्या तिजोरीमध्ये खडखडाट झाला आहे.
उद्या विरोधी पक्ष महानगरपालिकेच्या मुख्यालयावर मोर्चा नेत आहेत. त्यानंतर इतर पक्ष धरणे आंदोलन करत आहेत. ही दोन्ही आंदोलनाकडे लोक ” एक सोपस्कार,” म्हणून बघत आहेत. गेंड्याची कातडी असलेल्या प्रशासनाला काहीही फरक पडत नाही. असे मोर्चे व धरणे सत्ताधारी व अधिकाऱ्यांच्या अंगवळणी पडले आहे.ते कायम ” चलता है,” अशा भूमिकेत असतात.

