दीपक मोहिते,
बॉटमलाईन, ( नॅशनल डेस्कसाठी )
” अब्राहम अकॉर्डस,” च्या सक्तीमुळे, पाकिस्तान संतापला,
अमेरिका व इराण दरम्यान शांतता करार होण्याच्या दृष्टीने दोन्ही बाजूने सकारात्मक पावले पडत असताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एकामागोमाग अडथळे आणण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे मध्यस्थ म्हणून काम करणाऱ्या पाकिस्तान अमेरिकेवर संतापला आहे.
दोन राष्ट्रात बोलणी सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानकरित्या इराणसोबत शांतता करार करण्यासाठी पाकिस्तानला ” अब्राहम अकॉर्डस,” सामील होण्याची अट घातली, पण पाकिस्तानने अमेरिकेचा हा प्रस्ताव फेटाळून लावला आहे. इस्त्रायल सोबत राजनैतिक संबंध सुधारण्यासाठी असलेला हा करार आमची मूळ विचारधारा व धोरणाच्या विरोधात आहे. अशी स्पष्ट भूमिका पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा मोहंमद आसिफ यांनी घेतली आहे. यासंदर्भात आसिफ म्हणाले, पाकिस्तानच्या मूलभूत विचारसरणीशी तडजोड करणाऱ्या कोणत्याही करारात आम्ही सहभागी होणार नाही. ज्या व्यक्तीच्या शब्दावर आपण विश्वास ठेवू शकत नाही, अशा लोकांसोबत पाकिस्तान चर्चेला कसा बसू शकतो ? असा थेट प्रश्न त्यांनी विचारला आहे. पुढे जाऊन आसिफ म्हणतात, या कराराबाबत आमची भूमिका स्पष्ट आहे. त्यामुळे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाचा प्रस्ताव आम्हाला अजिबात मंजूर नाही. पाकिस्तान हा जगातील एकमेव असा देश आहे, ज्याच्या पासपोर्टवर इस्रायलचे नावदेखील नाही. इराण व अमेरिके दरम्यान होणारा शांतता करार अंतिम टप्यात असताना अमेरिकेने होर्मुज सामुद्रधुनीत इराणच्या गस्ती बोटीवर हल्ले करणे, इस्रायलचे दक्षिण लॅबेनॉनवर बॉम्बहल्ले चढवणे व आता मध्यस्थ म्हणून भूमिका पार पाडणाऱ्या पाकिस्तानने ” अब्राहाम अकॉर्डस,” मध्ये सामील व्हावे,म्हणून दडपण आणणे,अशा प्रकारामुळे परराष्ट्र धोरणाचे आंतरराष्ट्रीय अभ्यासक देखील बुचकळ्यात पडले आहेत. राष्टाध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना नेमके काय साध्य करायचे आहे ? यावर आता चर्चा सुरू झाली आहे. इराणला सोडून अमेरिका पाकिस्तानला का लक्ष्य करतोय ? हे कळेनासे झाले आहे. २०२० साली ट्रम्प यांच्या पहिल्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात या ” अब्राहम अकॉर्ड,” ची सुरुवात झाली होती. इस्त्रायल व अरब राष्ट्रात राजनैतिक, आर्थिक व सुरक्षाविषयक संबंध पूर्ववत करणे, असा या कराराचा उद्देश आहे. त्यावेळी संयुक्त अरब अमिराती,बेहरिन, मोरोक्को व सुदान या देशानी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या. पण इतर इस्लामिक राष्ट्रांनी हा करार धुडकावून लावला होता. डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतेच ट्विट करून पाकिस्तानसह सौदी अरेबिया,कतार, तुर्की व जॉर्डन,या देशांना अब्राहम अकॉर्डसमध्ये सामील होण्याचे आवाहन केले आहे. मध्यपूर्वेतील अमेरिका – इराण दरम्यान सुरू असलेला संघर्ष संपवण्यासाठी हे अत्यंत आवश्यक असल्याचे ट्रम्प यांचे म्हणणे आहे. संरक्षणमंत्री ख्वाजा महंमद आसिफ यांच्यासह परराष्ट्रमंत्री इशाक दार व लष्करप्रमुख असीम मुनीर यांनीही या कराराला विरोध केला आहे.
या सर्व घडामोडीमुळे इराण – अमेरिके दरम्यान होऊ घातलेला व अंतिम टप्यात असलेला शांतता करार लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

