दीपक मोहिते,
घराणेशाहीचे भयावह वास्तव ; खासदार, आमदार, पदाधिकारी व कार्यकर्ते संभ्रमावस्थेत,
” हल्लाबोल,”
अजित पवार यांच्या अकाली मृत्यूनंतर त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या घमासान सुरू झाले आहे. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार व मुलगा पार्थ पवार विरुद्ध सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल असा फड रंगला आहे. गेल्या २९ एप्रिल रोजी निवडणूक आयोगाला सादर केलेले पत्र निवडणूक आयोगाने संकेतस्थळावर प्रसिद्ध केल्यानंतर वादाला तोंड फुटले असून अंतर्गत घमासान सुरू झाले आहे.
या पत्रात सुनील तटकरे यांचा सरचिटणीस व प्रफुल्ल पटेल यांचा कार्याध्यक्ष म्हणून उल्लेखच करणे, टाळण्यात आले आहे. तसेच या दोघांना दिल्लीतील पक्ष कार्यालयात प्रवेशबंदी करण्यात आल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यामुळे हा सत्तासंघर्ष विकोपाला गेल्याचे स्पष्ट झाले आहे. निवडणूक आयोगाला पाठवण्यात आलेल्या पत्रात प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील, इ. नेत्यांची नांवे होती. तसेच सुनेत्रा पवार या राष्ट्रीय अध्यक्षा तर शिवाजी गर्जे यांचा खजिनदार म्हणून उल्लेख होता. पण तटकरे व पटेल यांचा अनुक्रमे सरचिटणीस व कार्यकारी अध्यक्ष म्हणून उल्लेख नव्हता, त्यामुळे पक्षात असलेल्या मतभेदावर एकप्रकारे शिक्कामोर्तब झाले आहे. या सर्व घडामोडीवर माध्यमात उलट सुलट चर्चा सुरू झाल्यानंतर ” पक्षाच्या कार्यकारिणीतील नावाबाबत प्रशासकीय चूक झाली असून, ती लवकरात लवकर सुधारण्यात येईल, अशी सारवासारव करण्यात आली.
अजित पवार यांच्या मृत्यूनंतर पक्षाची सूत्रे हाती घेण्यासाठी पटेल व तटकरे हे दोघे भाजपच्या मदतीने प्रयत्न करत असल्याचे स्पष्ट झाले होते. अजित पवार यांच्या पश्चात पक्ष व विधिमंडळ पक्षनेतेपदाची जबाबदारी सुनेत्रा पवार यांच्याकडे असली तरी पक्षाची संघटनात्मक सूत्रे पार्थ पवार यांच्याकडे गेली. याच पार्थ पवार यांनी पटेल व तटकरे यांचे मनसुबे उधळून लावले. आजच्या घडीला पक्षाची स्थिती अत्यंत कमकुवत झाली आहे. पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते संभ्रमावस्थेत सापडले आहे. कोणाकडे तक्रार करावी किंवा दाद मागावी हेच कार्यकर्त्याना कळेनासे झाले आहे. सत्तेत असूनही पक्षाची ताकद कमी झाल्यामुळे आमदारांमध्येही अस्वस्थता वाढू लागली आहे. पक्षात कोणत्याही विषयावर एकवाक्यता नसल्यामुळे पक्षाला उभारी मिळू शकणार नाही, अशीच परिस्थिती राहिल्यास भाजप आपले ” मिशन लोटस,” चे अस्त्र बाहेर काढेल, अशी शक्यता आहे.

