दिपक मोहिते,
” हल्लाबोल,”
घराणेशाही ; पण कुठवर ?
” घराणेशाही,” ला आपल्या समाजव्यवस्थेत पूर्वी बिलकुल स्थान नव्हते, पण हल्लीच्या काळात राजकीय नेत्यांना ही घराणेशाही हवीहवीशी वाटू लागली आहे. कालांतराने ही
इ घराणेशाही घराण्यातील लोकांच्या उरावर बसू लागल्यामुळे अनेक घराणी दुभंगत गेली. ही घराणेशाही सत्ता,राजकीय पक्ष सहकार,इ. क्षेत्रातील प्रचलित व्यवस्था मोडीत काढते. तरीदेखील ती
राजकीय मंडळींना ती हवीशी वाटते. आपल्या आप्तस्वकीयाना संधी देताना राजकीय पक्षाचे नेते सारे काही गुंडाळून ठेवतात व स्वतःचा स्वार्थ साधत असतात. घराणेशाही कशाला म्हणतात,हे जाणून घ्यायचे झाल्यास आपल्याला पवार कुटुंबाकडे बोट दाखवायला लागेल. शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार, सुनेत्रा पवार आणि आता पार्थ पवार ही जी रांग आपण पाहतो,ती पाहिल्यानंतर पवार कुटुंब ” घराणेशाही,” चे अँबेसॅन्डर म्हणा किंवा रोल मॉडेल म्हणा, पण अशी घराणेशाही कुठेच पाहायला मिळणार नाही. त्यानंतर मुंडे,चव्हाण,देशमुख,विखे पाटील,थोरात,या घराण्याची नांवे आपल्याला घेता येतील. माझ्यानंतर माझी बायको,माझा मुलगा किंवा मुलगी,भाऊ व इतर भावकी, असे हे सारे नातेवाईक, घराणेशाहीची प्रतिके आहेत. एरवी आमचे जिवाभावाचे कार्यकर्ते, कार्यकर्त्याशिवाय आम्ही शुन्य आहोत,अशी हाकाटी देणारे राजकीय नेते लाभाची पदे देताना मात्र या कार्यकर्त्यांच्या हाती भोके पडलेल्या करंट्या ठेवतात. कालांतराने हीच
घराणेशाही त्यांच्या छाताडावर बसते. सत्तेची चटक लागलेले अनेक जण आपले काका,मामा,बाबाना फाट्यावर मारू लागतात. राज ठाकरे हे त्याचे उत्तम उदाहरण ठरावे. स्वतःकडे सत्ता असताना उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे दूर लोटले व आज पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी मराठी माणूस,मराठी भाषेचे संवर्धन व मराठी अस्मिता,याला साद घालत,गळ्यात गळे घालण्यास सुरुवात केली. पण लोकांनी त्यांना या निवडणुकीत दूर लोटले. आपल्या नातेवाईकांना लाभाची पदे देताना या राजकीय मंडळींना कार्यकर्त्यांची निष्ठा, त्यांची मेहनत व त्यांचे स्वतःला झोकून देऊन पक्षाचे काम करणे, याकडे दुर्लक्ष करत राजकारण व समाजकारणाशी कधीही दुरान्वये संबंध न आलेल्या नातेवाईकांना लाभाची पदे देण्यात धन्यता मानतात. आज पवार कुटुंबातील अनेक सगे सोयरे विधानसभा,विधान परिषद,लोकसभा व राज्यसभेत पाहायला मिळत आहेत. घराणेशाहीला असाच उत येत राहिला तर कालांतराने पक्ष कार्यकर्ता हा औषधालाही सापडणार नाही.

