दीपक मोहिते,
नॅशनल डेस्कसाठी,
अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष ट्रम्प यांचे आर्थिक धोरण आपल्या देशाची अर्थव्यवस्था विस्कळीत करणारे…
तिसऱ्या क्रमांकाची आर्थिक महासत्ता बनण्याची स्वप्न बघणाऱ्या आपल्या देशाला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प एकामागोमाग धक्के देत आहेत.आपल्या शेअर मार्केटमधून विदेशी संस्थांनी सुमारे ३६ हजार ,५०० कोटी रु.ची गुंतवणूक काढून घेतल्यामुळे डॉलरच्या तुलनेत आपला रुपया ९१.९४ च्या नीचांकी स्तरावर पोहोचला आहे.
जागतिक बाजारात अमेरिकन डॉलरचे दिवसेंदिवस मजबूत होणे, इतर देशांच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम करणारे आहे.परदेशात शिकणारे विद्यार्थी व प्रवासासाठी डॉलर्स खरेदी करणे,आता आपल्या आवाक्याबाहेर झाले आहे.अमेरिकेचे राष्टाध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे आपल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आपण घनिष्ठ मित्र आहोत,असे भासवत असले तरी,दक्षिण आशियात असलेले भारताचे वर्चस्व मोडून काढण्यासाठी ट्रम्प काका सध्या आपल्या देशाची आर्थिक कोंडी करण्याच्या कामाला लागले आहेत.गेल्या दोन ते तीन वर्षात भारताने रशियाकडून कच्चे तेल खरेदी करण्यास सुरुवात केल्यामुळे ट्रम्पकाकांचे पित्त खवळले व त्यांनी टॅरिफवाढीचे हत्यार आपल्याविरुद्ध उपसले,त्यामुळे आपल्या निर्यात व आयात व्यवस्था सध्या अडचणीत आली आहे.आता विदेशी संस्थांनी भारतीय शेअर बाजारातून आपली गुंतवणूक काढून घेतल्यामुळे डॉलरच्या तुलनेत आपला रुपया कोसळला,काल संध्याकाळी डॉलर ९१.९४ रु.वर पोहोचला.२०१४ साली जेव्हा डॉलर ५८ रु.ला मिळत होता,तेंव्हा आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तत्कालीन पंतप्रधान डॉ.मनमोहनसिंग यांना रुपया पतला क्यो हो रहा है ? असा प्रश्न सातत्याने विचारत होते.आज तोच डॉलर ९२ रु.पोहोचला असताना नरेंद्र मोदी मूग गिळून बसले आहेत.राष्ट्राध्यक्षाच्या निवडणुकीदरम्यान अमेरिकेत जाऊन ट्रम्प,ट्रम्प म्हणून हाकाटी पिटणारे मोदी आज या ट्रम्प काकांचे कारनामे चुपचाप सहन करत आहेत.रुपयांची घसरण आपल्या अर्थव्यवस्थेला हळूहळू पोखरत आहे.कच्चे तेल,इलेक्ट्रॉनिक्स साहित्य व अन्य जीवनावश्यक वस्तु अधिक महाग होत आहेत.सेन्सेक्स व निफ्टी निर्देशांक घसरला.सेन्सेक्सच्या घसरणीमुळे बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज मधील गुंतवणूक धारकांचे सहा लाख कोटी रु.हुन अधिक नुकसान झाले आहे.येत्या सहा महिन्यात अमेरिकन डॉलर शंभरी पूर्ण करेल,अशी भिती अर्थतज्ज्ञ व्यक्त करत आहेत.ट्रम्पकाकाचे दादागिरीचे धोरण केवळ आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेला नाहीतर इतर देशांच्या अर्थव्यवस्थेला मारक ठरले आहे.

