दीपक मोहिते,
” दावोस ; एक पर्यटन,”
स्वित्झर्लंड या निसर्गरम्य देशातील दावोस येथे भरणारी वर्ल्ड इकॉ.फोरम ही संस्था काय आहे व तिचे कामकाज कशा पद्धतीने चालते,हे आपण जाणून घ्यायला हवे.या परिषदेत सहभागी होणाऱ्या देशात आपण किती गुंतवणूक आणली,यावरून स्पर्धा सुरू होत असते.पण,या दावोसमध्ये जाऊन नेतेमंडळी नेमके करतात काय ? हे जाणून घेण्याची गरज आहे.
हे वर्ल्ड इकॉ.फोरम म्हणजे नक्की काय आहे ? या प्रश्नाचे उत्तर आहे,ही एक खाजगी संस्था आहे.पण तिला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली आहे.जागतिक व्यापार,व्यवसाय,राजकारण,शिक्षण व उद्योग क्षेत्रातील व्यक्तींना एकत्र आणून प्रदेश विकासाला चालना देण्यासाठी १९७१ साली या संस्थेची स्थापना करण्यात आली.या परिषदेत सुमारे ३ हजार ५०० हुन अधिक लोक सहभागी होत असतात.सुरुवातीच्या काळात या परिषदेला जगभरातील महत्वाचे नेते आवर्जून उपस्थित राहत असत.पण,कालांतराने या फोरमवर ” खास लोकांचे स्नेहसंमेलन,” म्हणून टीका झाली.त्यामुळे बड्या राष्ट्राचे नेते या परिषदेकडे फिरकेनासे झाले. या परिषदेत सहभागी होणाऱ्यांना समान वागणूक मिळत नाही,अशी टीका देखील या परिषदेवर झाली.तसेच महिलांना या परिषदेत फारसे महत्व दिले जात नाही,असाही आरोप करण्यात येत असतो.त्यामुळे परिषदेच्या काळात निदर्शने व आंदोलने होताना पाहायला मिळतात.या परिषदेत महत्वाच्या जगभरातील देशाच्या महत्वाच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यात येत असते.तसेच बहुराष्ट्रीय कंपन्याचे वरिष्ठ अधिकारी,देशभरातील नेते व संस्थांचे पदाधिकारी यांच्या बैठका होऊन आर्थिक गुंतवणुकीचे सोपस्कार पार पाडले जातात.यंदाच्या परिषदेत सुमारे दोन हजाराच्या आसपास उद्योगपती सहभागी झाले आहेत.तसेच जगातील सर्वात मोठ्या ६०० कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारीही सामील झाले आहेत.या परिषदेला आपल्या राज्याचे मुख्यमंत्री,उद्योगमंत्री व वरिष्ठ अधिकारी आवर्जून उपस्थित राहतात.यंदा आपल्या राज्यात १४.५ लाख कोटीची गुंतवणूक होणार असल्याचे जाहीर झाले आहे.त्यामधून सुमारे दीड लाख लोकांना रोजगार मिळणार असल्याचे सरकारतर्फे सांगण्यात येत आहे.या वर्ल्ड इकॉ.फोरमच्या प्रत्येक परिषदेनंतर लाखो कोटीची गुंतवणूक आल्याची तसेच लाखो लोकांना रोजगार मिळणार असल्याच्या वावड्या उठत असतात,पण प्रत्यक्षात काहीही घडत नाही.त्यामुळे दावोसला मंत्र्यांचे जाणं,हे पर्यटनाला जाण्यासारखे असते,अशी टीका होत असते.

