दीपक मोहिते,
” हल्लाबोल, ”
याला म्हणतात, ” परफेक्ट टायमिंग, ”
दोन दिवसांपूर्वी बहुजन विकास आघाडीचे क्रमांक २ चे नेते व माजी महापौर राजीव पाटील यांनी आपल्या काही समर्थक उमेदवारांच्या भेटीगाठी घेतल्या.त्यांच्या या भेटीनंतर सर्वत्र वादळ उठले.नालासोपारा शहरातील त्यांचे व्यवसायिक भागीदार निलेश चौधरी यांची त्यांनी आवर्जून भेट घेतली.या भेटीत त्यांनी विरोधी पक्षाचे उमेदवार ” धनंजय गावडेला पाडा,” असे आवाहन केले.धनंजय गावडे हे बहुजन विकास आघाडीचे उमेदवार म्हणून या निवडणुकीच्या रिंगणात आहेत.एकेकाळी
माजी आ.हितेंद्र ठाकूर यांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जाणारे गावडे सध्या ठाकुरांच्या गळ्यातील ताईत झाले आहेत.राजू पाटील यांचे सहकारी निलेश चौधरी व माजी आ.हितेंद्र ठाकूर यांचे सध्याचे मित्र धनंजय गावडे हे दोघे एकमेकांसमोर उभे आहेत.त्यामुळे या प्रभागाकडे मतदारांचे लक्ष लागले आहे.
अशावेळी राजू पाटील यांनी केलेली खेळी ही अभूतपूर्व अशीच आहे.निवडणूक जाहीर झाल्यानंतर गेल्या पंधरा दिवसात कुठेही न फिरकणारे ( आपले सख्खे लहान भाऊ अजीव पाटील,यांच्या प्रभागातही ) राजीव पाटील हे नालासोपारा शहरात एका प्रभागात निवडणूक लढवणाऱ्या आपल्या भागीदाराला मदत करण्यासाठी आवर्जून येतात.या भेटीच्या वेळी त्यांच्या गळ्यात आपल्या पक्षाचा पिवळा दुपट्टा नसतो आणि ते बेधडक बोलून जातात,की ” धनंजयला पाडा,” या दोन शब्दांमुळे नालासोपारा शहरातील अनेक प्रभागातील निवडणुकीचे चित्र साफ बदलून गेले.क्रिकेट आणि राजकारण,या दोन क्षेत्रात ” टायमिंग,” ला अनन्यसाधारण महत्व असते.राजीव पाटील यांनी या निमित्ताने ती साधली.या सर्व घडामोडीमुळे मतदारांमध्ये वेगळे संकेत गेले असून बहुजन विकास आघाडी काही प्रमाणात बॅकफूटवर गेली आहे.राजीव पाटील यांच्या या कृतीमुळे भाजपला नक्कीच फायदा होऊ शकतो.दुसरीकडे शिंदे गटाचे उमेदवार व ठाकूर यांचे एकेकाळचे जिवलग मित्र सुदेश चौधरी यांनीही ठाकुरांवर तोफ डागली आहे.एका युट्युबरला दिलेल्या मुलाखतीमध्ये सुदेश चौधरी म्हणाले,” एकेकाळी ठाकूर विरोधी पक्षाला आव्हान करायचे की तुम्ही सर्वांनी एकत्र येऊन माझ्यासमोर एकच उमेदवार उभा करा,आज त्याच ठाकुरांना इतर पक्षाच्या कुबड्या घेण्याची पाळी का यावी ?
ही जी राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे,ती बहुजन विकास आघाडीला पोषक नाही.

