दीपक मोहिते,
” फ्रंटलाईन,” भाग क्र.१,
वर्चस्वाची लढाई कुठवर ? अवघे जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर…
आंतरराष्ट्रीय स्तरावर गेल्या पाच वर्षात घडत असलेल्या अनेक घटनांमुळे जग हे आता तिसऱ्या महायुद्धाच्या दिशेने वाटचाल तर करू लागले नाही ना ? असा प्रश्न साहजिकच तुम्हा – आम्हा सर्वांच्या मनात उभा राहतो.रशिया – युक्रेन व इस्त्रायल – पॅलेस्टाईन दरम्यान सुरू असलेले युद्ध,हे संपूर्ण जगाची वाटचाल,ही त्याच दिशेने सुरू झाल्याचे पावलोपावली जाणवत आहे.दुसरीकडे अमेरिका देखील अधूनमधून इराणच्या इस्लामिक सरकार व अफगाणिस्तानच्या तालिबान सरकारवर हल्ले चढवत असते.ही सर्व परिस्थिती जगाला युद्धाच्या खाईत ढकलणारी अशीच आहे.वरील चार देशात सुरू असलेल्या युद्धामुळे आजवर प्रचंड प्रमाणात नरसंहार झाला व आजही तो सुरूच आहे.आजच्या घडीला प्रत्येक देशाकडे अत्यंत प्रगत व अत्याधुनिक अशी शस्त्रास्त्रे आहेत.पूर्वी दोन देशात होणारे युद्ध हे जमिनीवर होत असे,आता परिस्थिती पूर्णपणे बदलली गेली आहे.
आता मानवरहीत ड्रोनच्या साहाय्याने क्षेपणास्त्रे डागण्यात येत असतात.ज्या हमासकडे पुरेसे सैन्यबळ नसतानाही तो ड्रोनच्या मदतीने इस्त्रायलवर क्षेपणास्त्रे डागतो,यावरून जग किती विनाशाच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचले आहे,याची आपल्याला कल्पना येऊ शकते.अमेरिका सातासमुद्रापलीकडून इराणच्या अणूभट्ट्यावर प्रखर हल्ले चढवू शकतो,यावरून तंत्रज्ञान किती प्रगत झाले आहे,याची जाणीव आपल्याला पावलोपावली होत आहे.१९९२ पूर्वी अमेरिका व सोव्हिएत युनियन ( एकसंघ रशिया ) या दोन बलाढ्य देशामध्ये वर्षानुवर्षे शीतयुद्ध सुरू होते.बलाढ्य अमेरिकेच्या सीआयएने ९० च्या अखेरीस सोव्हिएत युनियनची अखंडता व एकात्मतेला सुरुंग लावला व बलाढ्य सोव्हिएत युनियनची शकले झाली.अनेक देश फुटून निघाले,व उरला फक्त रशिया…
रशियाचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बोरिस येल्त्सिन यांच्या काळात रशियात आर्थिक अराजक निर्माण झाले होते.दिवसाचे अठरा तास बोरिस येल्त्सिन हे व्यसनाच्या अधीन असायचे,त्यांचे देशाच्या कारभाराकडे लक्ष नसायचे.आपल्याला देशाचा कारभार चालवता येत नाही,हे त्यांनी स्वतःहून जाणले व त्यांनी ब्लादिमिर पुतीन यांना पंतप्रधानपदी आणले आणि याच पुतीन यांनी देशाला पुन्हा वैभव मिळवून दिले.एकेकाळी जगभरात बदनाम झालेल्या रशियाच्या केजीबी या गुप्तहेर संघटनेचे अनेक वर्षे उच्चपदस्थ अधिकारी म्हणून सक्रिय होते.त्यांनी अनेक देशातील सरकारे उलथवून टाकणाऱ्या कारवाईत मोलाची कामगिरी बजावली होती.उलट्या काळजाचा आणि माथेफिरू अधिकारी म्हणून ओळख असलेल्या पुतीन यांनी अल्पावधीत पंतप्रधानपदावरून थेट राष्ट्राध्यक्षपदावर झेप घेतली व देशावर आपली पोलादी पकड बसवली.आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात पुतीन यांनी आर्थिक सुधारणा व रोजगाराच्या संधी निर्माण करण्यावर भर दिला.त्याला रशियन जनतेकडून उत्तम प्रतिसाद मिळत गेला.त्यानंतर अवघ्या काही वर्षात देशाला सुस्थितीत आणण्यात पुतीन कमालीचे यशस्वी ठरले.या यशानंतर त्यांनी देशांतर्गत असलेले आपले विरोधक संपवायला व आपल्यापासून फुटून निघालेल्या देशाच्या नाड्या आवळण्यास सुरुवात केली.आज युक्रेनच्या बाबतीत जे काही घडत आहे,तो त्याचाच एक भाग आहे.त्यांच्या या विस्तारवादी धोरणाला पायबंद घालण्यासाठी अमेरिका,नाटो ( नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्ग.) या १२० देशाच्या संघटनेला पुढे करून रशियाला वेसण घालू पाहत आहे.युक्रेनला नाटोमध्ये सामील करून घेण्यासाठी अमेरिका प्रचंड कारवाया करत आहे.युक्रेनला जर या संघटनेची सदस्यता मिळाली की नाटोचे सैन्य आपल्या वेशीवर येऊन उभे ठाकेल व ते आपल्या देशाच्या सुरक्षेसाठी धोकादायक ठरणारे असेल,त्यामुळे पुतीन सध्या युक्रेनचा नायनाट करू पाहत आहे.
क्रमशः

