पालघर विशेष प्रतिनिधी,
शिंदे गटाचेही भाजपापाठोपाठ फाडाफोडीचे राजकारण सुरु,
भाजप पाठोपाठ शिवसेना शिंदे गटानेही बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्याना आपल्या गळाला लावण्यास सुरुवात केली आहे.दोनच दिवसापूर्वी वसई,नालासोपारा व नायगाव परिसरातील बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्याना भाजपने प्रवेश दिल्यानंतर काल शिंदे गटानेही ” हम भी कुछ कम नही,” हे दाखवून देण्यास सुरुवात केली आहे.

काल नालासोपारा शहरातील आचोळे विभागातील बहुजन विकास आघाडीच्या एका माजी नगरसेविकासह तीन माजी नगरसेवकांची मुले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये पक्षात प्रवेश करते झाले.
आचोळे,हा भाग बहुजन विकास आघाडीचा गड म्हणून ओळखला जात असे,पण गेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत त्यांची चांगलीच पीछेहाट झाली.या प्रभागात फारशी विकासकामे न झाल्यामुळे हा भाग कायम मागासलेलाच राहिला होता.त्याचा फटका या दोन्ही निवडणुकीत बविआला चांगलाच बसला.या भागातील पाणीटंचाई,आरोग्य व स्वच्छता,इ.नागरी सोयी सुविधाना प्राधान्य न देता गोविंदा व महिलांचे हळदीकुंकू असे इव्हेन्ट करण्यात बहुजन विकास आघाडीच्या स्थानिक नेत्यांनी कायम धन्यता मानली.पण या त्यांच्या इव्हेन्टला महायुतीच्या लाडकी बहीण योजना व आनंदाचा शिधा,या योजनेने छेद दिला व बहुजन विकास आघाडीला चांगलाच सेटबॅक बसला. त्यानंतर काल शिंदे गटाने माजी नगरसेविका प्रतिमा पाटील,माजी नगराध्यक्ष जयराम पाटील यांचे चिरंजीव माजी नगरसेवक व आगरी समाजाचे अध्यक्ष ( आचोळे विभाग ) विशाल जयराम पाटील,माजी नगरसेवक केशव पाटील यांचे चिरंजीव भूषण पाटील,अमोल हरिश्चंद्र पाटील,विशाल हरिश्चंद्र पाटील,तुषार विजय पाटील व विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी व असंख्य कार्यकर्ते यांना आपल्या पक्षात प्रवेश दिला.या पक्षप्रवेश सोहोळ्याप्रसंगी शिवसेनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
या पक्षप्रवेशापूर्वी भाजपने देखील दोनच दिवसांपूर्वी नालासोपारा व नायगाव भागातील बविआच्या अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांना भव्य सोहोळ्यात प्रवेश दिला होता.आता शिंदे गटानेही त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत फोडाफोडीचे राजकारण सुरु केले आहे.

