दीपक मोहिते,
निवडणुक रणसंग्राम,
माजी निवडणूक आयुक्त स्व.टी.एन.शेषन आज हयात असते तर …
गेले दहा दिवस सुरू असलेल्या नगरपरिषदा व नागरपंचायतीच्या निवडणुकीचा प्रचार आज रात्री दहा वाजता थांबणार असून आजची रात्र उमेदवारांसाठी वैऱ्याची रात्र आहे.कारण,रात्रीच्या अंधारात ” रात्रीचा खेळ चाले,” या प्रयोगाचा खेळ हा गेल्या दहा दिवसाच्या मेहनतीवर पाणी फिरवणारा असतो.त्यामुळे उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्याना रात्रभर ” जागते रहो,” च्या भूमिकेत राहावे लागते.
गेल्या १२ वर्षापासून आपल्या देशात रात्रीच्या वेळी ” पैश्याचा खेळ चाले,” हा नवीन खेळ सुरू झाला आहे आणि हा खेळ तुमच्या आमच्या मनात रुजवण्याकामी या नाट्याचे निर्माते कमालीचे यशस्वी झाले आहेत.त्यामुळे या खेळात कोटी,कोटीची उड्डाणे पाहायला मिळू लागली आहेत.

मतदान हा आपला अधिकार असून त्याचे प्रामाणिकपणे वापर करणे,हे आपले कर्तव्य आहे.ते एक लोकशाही व्यवस्थेतील महत्वाचे हत्यार आहे.असे पूर्वी म्हंटलं जात असे.ती संकल्पना आता मोडीत निघाली आहे.लोकसेवक म्हणून तुम्ही लोकांची किती कामे केली,तुमचा सचोटीपणा,प्रामाणिकपणा हे सारे या कोटी कोटी रु.च्या उड्डाणासमोर धुळीला मिळाली आहेत.ज्या माजी निवडणूक आयुक्त स्व.टी.एन.शेषन यांनी आपल्या कारकिर्दीत अशा गैरकृत्याना पायबंद घातला,ज्यानी आपल्या लोकशाही देशाला चांगले वळण लावले.ते शेषन जर आज हयात असते,तर सद्यस्थिती पाहून नक्कीच हातभट्टीची दारू पिऊन गडबडा लोळले असते.कारण,आता केंद्रीय निवडणूक आयोग ज्या पद्धतीने कारभार चालवत आहे,त्या कारभाराला आपण ” स्वायत्तपणा,” जपत आयोग,कारभार करतो,असे म्हणू शकत नाही.एक मत जर १५ हजार रु.ला विकले जात असेल तर सारं काही संपल्यात जमा आहे.दोन दिवसांपूर्वी मालवण येथे येथे एका पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या घरात २५ लाख रु.चे घबाड मिळाले.तर दुसरीकडे पालघर येथे भाजपच्या नेत्याने उमेदवारी देण्यासाठी दहा लाखाची मागणी केली.त्यामुळे इच्छुक महिला उमेदवाराने जो धांगडधिंगाणा घातला व दोन गटात जी हाणामारी झाली,त्यावरून आपली वाटचाल कोणत्या दिशेने सुरू झाली आहे,हे आपल्या लक्षात येते.उमेदवारी मिळाली की मतदारांना वाटण्यासाठी पक्षाकडून पैश्याचे घबाड मिळतेच,पण निवडून आल्यानंतर आपल्या लोकसेवकाचे ” पांचो उंगली घी,” मध्ये राहत असल्यामुळे निवडणुकीचे तिकीट मिळवण्यासाठी धमासन होत आहे. त्यासाठी आता प्रतिस्पर्ध्याशी दोन हात करण्यासाठी महिला देखील रणरागिणीच्या भूमिकेत वावरायला लागल्या आहेत. ” लोकसेवक,” या शब्दाची आता ” मोडतोड तांबा पितळ,” करण्यास सुरुवात झाली आहे.

