दीपक मोहिते,
” सुखद बाब,”
माजी आ.ठाकूर यांचे पुन्हा सक्रिय होणे,पक्षाला पुन्हा सुगीचे दिवस येणार….
बहुजन विकास आघाडीचे वरिष्ठ नेते व वसईचे माजी आ.हितेंद्र ठाकूर हे पुन्हा सक्रिय झाले आहेत.बहुजन विकास आघाडीसाठी ही एक सुखद बाब आहे.त्यांच्या सक्रिय होण्यामुळे पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्तेही चांगलेच ताजेतवाने झाले असून ठाकुरांच्या खांद्याला खांदा लावून ही निवडणूक जिंकण्यासाठी प्राणाची बाजी लावतील.हितेंद्र ठाकूर हे प्रकृती अस्वस्थामुळे गेल्या दीड ते दोन वर्षांपासून पक्षाच्या दैनंदिन कामकाजापासून दूर होते.त्याचे परिणाम गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना भोगावे लागले.गेल्या निवडणुकीत ते स्वतःच्या प्रचारातही फारसे उतरले नव्हते.त्यामुळे त्यांना अवघ्या २ ते ३ हजार मतांनी पराभव पत्करावा लागला.त्यांचा हा पराभव मतविभागणीमुळे झाला होता.पण,पराभव हा शेवटी पराभवच असतो.वास्तविक गेली तीन दशके अबाधित असलेली सत्ता त्यांच्या हातून जाणे,हे वसईकरांच्या मनाला चटका लावून जाणारे होते.आता महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते पुन्हा बाहेर पडले असून त्यांनी स्वतःला प्रचारात झोकून दिले आहे.प्रत्येक विभागात कार्यकर्त्यांचे मेळावे घेण्यात येत आहेत.
गेल्या दोन महिन्यात तालुक्याच्या प्रत्येक विभागात त्यांनी मेळावे घेण्याचा सपाटा लावल्यामुळे कार्यकर्त्यामध्ये आलेली मरगळ नाहीशी झाली आहे.त्यांच्या सक्रिय होण्यामुळे भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणाला काही अंशी खीळ बसली आहे.सध्या त्यांनी आपल्या मेळाव्यात कार्यकर्त्याना मार्गदर्शन करण्याचे सत्र आरंभले आहे.त्यांच्या या प्रयत्नाला बऱ्यापैकी यश मिळत आहे.फिनिक्स पक्ष जसा राखेतून उंच भरारी घेतो,त्याप्रमाणे हितेंद्र ठाकूर हे देखील आगामी काळात चांगलीच भरारी घेतील,असे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.वसईकर जनतेत आजही त्यांची क्रेझ आहे.२००९ साली विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाच्या उमेदवाराचा पराभव झाल्यानंतर त्यांनी एका समारंभात अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत ” मी २०१४ साली पुन्हा विधानसभेत तुम्हाला पाहायला मिळेन,” अशी सिंहगर्जना केली होती व त्यांनी निवडणुकीत पुन्हा बाजी मारली.हितेंद्र ठाकूर हे सहजासहजी हार मानणारी व्यक्ती नाही,हे वसईकर जनतेलाही माहीत नाही.त्यांच्या पुन्हा बाहेर पडण्याने भाजपही सावध झाला आहे.हितेंद्र ठाकूर यांना रोखण्यासाठी त्यांनाही आपल्या निवडणूक स्ट्रॅटेजीमध्ये बदल करावा लागणार आहे.

