दीपक मोहिते,
हातबट्ट्याचा व्यवहार,
….अन्यथा एसटी महामंडळाच्या लाखमोलाच्या जमिनी धनदांडग्याच्या घश्यात जातील..
व्यवसायिक जेंव्हा मंत्री होतो, तेंव्हा त्याचा व्यवसायिक दृष्टिकोन मात्र तसाच राहतो. आपण आता केवळ व्यवसायिक नसून लोकसेवक आहोत,याची त्यांना जाणीव नसते.राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक हे त्याचे उत्तम उदाहरण आहेत.बिल्डर असलेल्या प्रताप सरनाईक यांच्याकडे परिवहनमंत्री आल्या आल्या त्यांची वक्रदृष्टी एसटी महामंडळाच्या मोक्याच्या जमिनीवर पडली व त्यांनी आर्थिक स्रोत वाढवण्यासाठी या जमिनी विकण्याचा घाट घातला.परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे मनसुबे धुळीस मिळवले.पण त्यानंतरही या प्रताप सरनाईकांचे प्रताप मात्र सुरूच आहेत.
त्यांनी पुन्हा आर्थिक उत्पन्नाचा नवा स्त्रोत निर्माण करण्याच्या हेतूने एसटी महामंडळ राज्यभरात स्वतः च्या जमिनीवर २५० ठिकाणी व्यवसायिक तत्त्वावर पेट्रोल आणि डिझेल बरोबरच सी.एन.जी.आणि इलेक्ट्रिक चार्जिंग पॉईंट असलेले किरकोळ विक्री ( किरकोळ विक्री ) पंप सुरू करत असल्याचे जाहीर केले आहे.
एसटी महामंडळाच्या मुख्यालयात याविषयी बोलावण्यात आलेल्या बैठकीत बोलताना परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली.या बैठकीला एस.टी.महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ.माधव कुसेकर, आर्थिक सल्लागार व मुख्य लेखा अधिकारी गिरीश देशमुख व सर्व खाते प्रमुख उपस्थित होते.यावेळी परिवहनमंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की,एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती अत्यंत नाजूक आहे.अशा परिस्थितीमध्ये केवळ प्रवासी तिकीट विक्रीतून मिळणाऱ्या महसुलावर अवलंबून राहणे योग्य होणार नाही.त्यासाठी उत्पन्नाचे नवे स्त्रोत निर्माण करणे गरजेचे आहे.गेल्या ७० वर्षापेक्षा अधिक काळ एसटी महामंडळ इंडियन ऑइल आणि भारत पेट्रोलियम या सार्वजनिक क्षेत्रातील ऑइल कंपन्यांकडून डिझेल इंधन विकत घेत आहे.सध्या २५१ ठिकाणी एसटीच्या स्वतःच्या जमिनीवर पेट्रोल पंप उभारले असून याद्वारे केवळ एसटीच्या बसेससाठी डिझेल इंधनाचे वितरण होते.अर्थात,पेट्रोल पंप चालवणे आणि त्याचे देखभाल करण्याचा उत्तम अनुभव एसटी महामंडळाकडे आहे.त्यामुळे भविष्यात सर्वसामान्य ग्राहकांसाठी पेट्रोल आणि डिझेल आणि सी.एन.जी.या पारंपारिक इंधन विक्री बरोबर इलेक्ट्रिक चार्जिंग पॉईंट असलेले पंप उभारणे,प्रस्तावित आहे,असे या बैठकीत स्पष्ट केले.
ते पुढे म्हणाले की,असे समुच्चय इंधन विक्री पंप हे रस्त्यालगत व व्यवसायिक दृष्ट्या मोक्याच्या ठिकाणी असणे आवश्यक आहे. त्यानुसार राज्यभरातील एसटी महामंडळाच्या स्वतःच्या ज्या जागा आहेत,त्यांचे सर्वेक्षण करण्यात आले असून,अशा २५० पेक्षा जास्त जागेवर ४० बाय ३० मी.जागा निश्चित करण्यात येत आहेत.या ठिकाणी एसटी महामंडळाचे केवळ इंधन विक्रीच नाही,तर रिटेल शॉप देखील उभारण्यात येणार आहेत.त्यामुळे येथे इतर व्यवसायाला देखील पूरक संधी उपलब्ध होईल.यातून एसटी महामंडळाला सार्वजनिक-खाजगी भागिदारी तुन चांगला महसूल देखील मिळू शकतो,असे त्यांचे म्हणणे आहे.
परिवहनमंत्री सरनाईक पुढे म्हणाले की,खुल्या निविदा प्रक्रियेच्या माध्यमातून इंडियन ऑइल,भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या बरोबर देशातील नव्हे तर जगभरातील इंधन विक्रीतील नामांकित कंपनींना एस.टी. महामंडळाच्या सुमारे २५० पेक्षा जास्त जागांवर व्यवसायिक तत्वावर समुच्चय इंधन विक्री केंद्र उभे करण्यासाठी आम्ही निमंत्रित करीत आहोत.जेथे एस.टी. महामंडळाला स्वतःच्या बसेस साठी इंधन भरण्याची सोय असेल,त्याचबरोबर सर्वसामान्य ग्राहकाला देखील किरकोळ इंधन विक्री करणे शक्य होईल.अशा पद्धतीचे ‘ पेट्रो – मोटेल हब ” उभा करण्याचा आमचा मानस आहे.
” भविष्यात व्यवसायिक इंधन विक्रीतुन सर्वसामान्य ग्राहकाला विश्वासार्ह इंधन विक्री केंद्र एस.टी. महामंडळाच्या माध्यमातून उपलब्ध होईल,तसेच महामंडळाला देखील उत्पन्नाचा नवा स्त्रोत निर्माण होईल,”
ही एकप्रकारची लूट असुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा गैरव्यवहार वेळीच रोखावा,अन्यथा सरकारच्या या जमिनी,परिवहनमंत्री प्रताप सरनाईक धनदांडग्याच्या घशात घालतील.

