वसईतील वाहतूक कोंडी ; आ.स्नेहा दुबे पंडित यांच्या नेतृत्वाखाली महत्वपूर्ण बैठक संपन्न,
वसईतील वाहतूक कोंडीचा अत्यंत जटील व गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न कायमस्वरुपी निकाली काढण्यासाठी वसईच्या आ.स्नेहा दुबे पंडित यांनी शासनाकडे पाठपुरावा सुरू केला आहे.महानगर पालिका क्षेत्रातील एस.टी.आगाराच्या जागेचा पी.पी.पी.तत्वावर विकास करून तेथे पे अँड पार्क व्यवस्था उपलब्ध करण्यात येणार आहे.त्यामुळे हा ज्वलंत प्रश्न आता लवकरच निकाली निघणार आहे.
वसई तालुक्यातील अपुरी आणि विस्कळीत सिग्नल व्यवस्था,पुरेसे गतिरोधक नसणे,झेब्रा क्रॉसिंग नसणे,यामुळे नागरिकांना विशेष करून वयोवृद्ध जेष्ठ नागरिक,महिला,विद्यार्थ्यांना दररोजच्या प्रवासादरम्यान येणाऱ्या अडचणी तातडीने दूर करण्यासाठी आ.स्नेहा दुबे पंडित यांनी आज सर्व संबंधित अधिकाऱ्यांची एकत्रित बैठक घेतली.या बैठकीमध्ये महानगर पालिका क्षेत्रातील मुख्य रस्त्यावर पुरेसे गतिरोधक नसल्याचे तसेच अस्तित्वात असलेल्या गतिरोधकांवर सफेद रंगांचे पट्टे नसल्याकडे अधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यात आले व त्वरीत पाहणी करून या मुद्यांवर तात्काळ कार्यवाही करण्यात यावे असे आदेश या अधिकाऱ्यांना देण्यात आले.
यावेळी झालेल्या चर्चेत रस्त्याच्या कडेला बंद स्थितीत उभी असलेली वाहने,काही विशिष्ट दुकांनांसमोर नियमबाहय व अस्ताव्यस्त पार्क करण्यात येणारी वाहने यामुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडी व नागरिकांना होणारा त्रास अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणण्यात आले. ही वाहने तात्काळ हटवण्यात येतील तसेच दिवसभरात विशिष्ट वेळेत रस्त्याच्या कडेला पार्किंगचे नियोजन करून तसे फलक लवकरच लावण्यात येतील,असे संबंधित अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
रेल्वे स्टेशन परिसरातील अनधिकृत फेरीवाले – हातगाड्यासुद्धा वाहतूक कोंडीला कारणीभूत असल्याने लवकरात लवकर फेरीवाला धोरण निश्चित करण्याचे व तोपर्यंत बेकायदा फेरीवाल्यांवर परिणामकारक कार्यवाही करण्यात येईल अशी माहिती उपस्थित अधिकाऱ्यांनी दिली.
सदर बैठकीस वसई विरार शहर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त दिपक सावंत,मीरा भाईंदर वसई विरार सहा.पोलिस आयुक्त वाहतूक शंकर इंदलकर,विरार वाहतूक विभाग वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश शेट्ये, वसई वाहतूक विभाग वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत लांगी, नायगाव पोलिस ठाणे सहा पोलिस निरीक्षक यशपाल सूर्यवंशी,माणिकपूर पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हरिलाल जाधव,वसई पोलिस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण घाडीगांवकर, प्रादेशिक परिवहन अधिकारी वसई अतुल आदे,सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी वसई दिपक उगले,वसई विरार शहर महानगरपालिकेचे शहर अभियंता प्रदीप पाचंगे, भाजपा वसई विरार शहर जिल्हा सरचिटणीस बिजेंद्र कुमार व अन्य संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

