पालघर प्रतिनिधी,
मुरबे गावात रात्रभर ड्रोनचा वावर,
मौजे मुरबे येथे रात्रीच्या वेळी ड्रोनद्वारे सुरू असलेल्या संशयास्पद वावरामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी ग्रामस्थांनी सातपाटी सागरी पोलीस ठाणेत लेखी तक्रार दाखल करून तात्काळ चौकशीची मागणी केली आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, दोन दिवसापूर्वी रात्री सुमारे ११:३० ते १:३० च्या सुमारास तीन ते चार मोठ्या आकाराचे ड्रोन मुरबे गावाच्या परिसरात फिरताना दिसले.हे ड्रोन गावाच्या आतील भागाचे तसेच आजूबाजूच्या परिसराचे छायाचित्रण करत असल्याचे दिसून आले.ड्रोनचे उड्डाण रात्रीच्या वेळी झाल्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम आणि घबराट निर्माण झाली होती.
या ड्रोनचा उद्देश काय होता, आणि ते कोणत्या संस्थेकडून पाठवण्यात आले होते,याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याने गावकरी संशय व्यक्त करत आहेत.काही ग्रामस्थांनी असा संशय व्यक्त केला आहे की, या ड्रोनद्वारे मुरबे परिसरात प्रस्तावित जिंदाल पोर्ट प्रकल्पाचा बेकायदेशीर सर्वेक्षण सुरू असले पाहिजे. जर अशाप्रकारे सर्व्हे होत असेल तर लोकांच्या खाजगी जीवनात ढवळाढवळ होत असून,परिसरात असुरक्षिततेची भावना पसरली आहे.
ग्रामस्थांनी या प्रकाराबाबत चिंता व्यक्त केली असून, पोलिसांनी संबंधित ड्रोन कुठून येतात,कोण पाठवत आहेत आणि त्यांचा उद्देश काय आहे, याची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी,अशी मागणी केली आहे.रात्रीच्या वेळी अशा प्रकारे ड्रोन उडवणे हे संशय निर्माण करणारे असल्याने या प्रकरणात पोलिसांनी सखोल तपास करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
कोट –
फक्त मुरबे नाही तर मुरबे गावाच्या आजूबाजूच्या गावात देखील सदर ड्रोन सर्व्हे सुरू होता,ज्यात आलेवाडी, खारेकुरण,नांदगाव व कुंभवली आदी गावांचा समावेश आहे.याच परिसरात अणुशक्ती केंद्र कार्यरत आहे, याबाबत पोलिसांना देखील कल्पना नाही,त्यामुळे हा गंभीर विषय आहे,
–धीरज गावड,
रहिवासी,नांदगाव
सर्व्हे म्हणता येणार नाही,ड्रोन फिरत होते,परंतु ते कशाचे होते ते माहीत नाही. या प्रकरणाचा आम्ही रात्रभर शोध घेत होतो.पण काहीही सापडले नाही.
उद्धव सुर्वे,
प्रभारी- सातपाटी सागरी पोलीस ठाणे

