सुरेश काटे,तलासरी,
उधवा ग्रामस्थांनी स्वखर्चाने बनवला रस्ता,
उधवा केवडीपाडा येथील रस्त्याची दयनीय अवस्था झाली होती,या रस्त्यावरून वाहन चालवणे व साधे चालणेही अवघड झाले होते. हा रस्ता दुरुस्त करण्याबाबत उधवा केवडीपाडा येथील ग्रामस्थानी उधवा ग्रामपंचायत, जिल्हा परिषद बांधकाम विभाग,सार्वजनिक बांधकाम विभाग यांना अनेक विनंती अर्ज केले पण करतो यापलीकडे कोणतेही उत्तर मिळत नसल्याने अखेर केवडी पाड्यातील ग्रामस्थानी स्वखर्चाने आणि श्रमदानाने केवडीपाड्यात येणारा रस्ता बनवला.
उधवा केवडीपाडा येथील कच्चा अत्यंत खराब झाला होता,रस्त्यात मोठे खड्डे पडले होते,खड्ड्यांमुळे वाहनाचे मोठे नुकसान होत होते, पावसाळ्यात चालणेही अवघड झाले होते,हा रस्ता दुरुस्त करावा म्हणून गावातील तरुण वर्ग ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामसेवक यांना वारंवार भेटून विनंती अर्ज करत होते,पण करतो,बघतो यापलीकडे त्यांना उत्तरे मिळत नव्हती.
अखेर गावातील तरुण वर्ग एकवटला आणि पाड्यातील लोकांकडून रस्त्यासाठी वर्गणी जमा करून काल सकाळ पासून श्रमदानातून रस्ता बनवायला सुरुवात केली आणि तो पूर्ण देखील केला.लोकहिताचे काम तरुणांनी एकत्र येऊन मार्गी लावल्यामुले ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे. गावातील रस्त्यासाठी आलेला निधी ग्रामपंचायत कुठे खर्च करते असा प्रश्न स्थानिक ग्रामस्थ आता विचारू लागले आहेत.

