दीपक मोहिते,
निवडणूक पर्व – प्रभाग क्र.२५,
मिश्र लोकसंख्येचा प्रभाग बविआ राखणार का ?
हा प्रभाग वसई गाव म्हणून ओळखला जातो.स्थानिक व बाहेरून स्थलांतरीत झालेले नागरिक,अशी रचना या प्रभागाची आहे.हिंदू,ख्रिस्ती व मुस्लिम अशी मिश्र लोकवस्ती या प्रभागात पाहायला मिळते.शहरी भागाला लागून असलेल्या परिसरात टोलेजंग इमारती व गावात छोटेखानी कौलारू घरे असे या प्रभागाचे स्वरूप आहे.महानगरपालिका स्थापन होण्यापूर्वी येथे सुमारे अनेक वर्षे वसई नगरपालिका अस्तित्वात होती.
या नगरपालिकेच्या काळात अनेक नागरी समस्या भेडसावत होत्या,त्याचे प्रमाण हल्ली कमी झाले आहे.मात्र या प्रभागाचा नियोजनबद्ध विकास मात्र होऊ शकला नाही.त्यामुळे अरुंद रस्ते,वाहतूक कोंडी,मार्केट,वाहनतळ व अन्य नागरी समस्या आजही ” जैसे थे,” स्थितीच आहेत.नगरपरिषद काळात निवडून आलेल्या नगरसेवकांनी परिसर विकासाकडे दुर्लक्ष केल्यामुळे हा प्रभाग विकासाच्या बाबतीत कायम मागासलेला राहिला.लोकसंख्या वाढत गेली,पण त्या तुलनेत नागरी सुविधांमध्ये वाढ झाली नाही.त्याचा त्रास मात्र येथील नागरिकांना सहन करावा लागला.महानगरपालिका स्थापन झाल्यानंतर काही अंशी बदल झाला.पण लोकसंख्यावाढीचा वेग लक्षात घेता भविष्यात सध्या उपलब्ध असलेल्या नागरी सुविधांचा बोजवारा उडण्याची शक्यता अधिक आहे.या प्रभागावर बहुजन विकास आघाडीचे गेली तीन दशके निर्विवाद वर्चस्व राहिले.पण प्रभावीपणे विकासकामे होऊ शकली नाहीत.शहरी व ग्रामीण असा दुहेरी चेहरा असलेल्या या प्रभागात गेल्या दहा वर्षात लोकसंख्येमध्ये भरमसाठ वाढ होत गेली.सध्या मोठ्याप्रमाणात नागरी संकुले उभारण्यात येत आहेत.१२ मजली इमारतींना सरसकट परवानग्या देण्यात येत आहेत.त्यामुळे भविष्यात,पाणी,आरोग्य,
कचरा निर्मूलन,वाहतूक कोंडी,साफसफाई व वैद्यकीय सेवेचा बोजवारा उडणार आहे.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीमध्ये या प्रभागात भाजप व बहुजन विकास आघाडी या दोघांमध्ये सामना रंगणार आहे.
या प्रभागाची लोकसंख्या ४० हजार २१८ इतकी असून त्यापैकी अनु.जाती – ७६४ तर अनु.जमाती – ५ हजार ८६१ इतकी आहे.तसेच या प्रभागात भाबोळा नाका,बंगली हॉस्पिटल,फिलिप कॉम्प्लेक्स,दत्तानी मॉल, उमेळा फाटा,होळी बाजार,बेनापट्टी,डॉ.डिसोझा हॉस्पिटल,रमेदी क्रॉस,भास्कर आळी,प्रभू आळी,जुने जानकी टॉकीज,शनी मंदिर,रमेदी चर्च,मांडलई दिघा,आणि सेंट मायकल चर्च,आदी परिसराचा समावेश आहे.

