दीपक मोहिते,
निवडणूक पर्व – प्रभाग क्र.२३,
प्रभागात अद्ययावत मार्केट व पार्किंगची व्यवस्था हवी,
सर्वात कमी क्षेत्रफळ व लोकसंख्या असलेल्या या प्रभागात विविध जाती धर्माचे लोक गेल्या अनेक वर्षांपासून गुण्यगोविंदाने राहत आहेत.साधारणपणे हे लोक मध्यमवर्गीय गटातील लोक म्हणून ओळखले जातात.हा भाग विकसित असा असून काही किरकोळ अपवाद वगळता या प्रभागात राहणारे लोक सुखी व समाधानी आहेत.या प्रभागात गुजराती समाजाचे चांगले प्राबल्य आहे.हा समाज व्यापार उदिमामध्ये सक्रिय आहे. मुस्लिम समाजाचेही व्यापारी क्षेत्रात बऱ्यापैकी योगदान आहे.गेली अनेक वर्षे या प्रभागात बहुजन विकास आघाडीचे नगरसेवक निवडून येत आहेत.परंतु या निवडणुकीत त्यांच्यासमोर या जागा टिकवण्याचे आव्हान आहे.हे आव्हान ते कसे पेलतात,यावर,त्यांचे यश अवलंबून आहे.
प्रभागात ओमनगर,पंचवटी नाका,१०० फुटी रस्ता,अंबाडी रोड,साई नगर,साईनगर मैदान,पार्वती टॉकीज,अंबाडी सर्कल,शास्त्री नगर,विशाल नगर,दीनदयाळ नगर व के.टी.वाडी अशा परिसराचा समावेश आहे.एकूण लोकसंख्या ३९ हजार ९२९ च्या घरात आहे.या प्रभागात मोठ्याप्रमाणात व्यापारी क्षेत्र असल्यामुळे नागरी सुविधा योग्य प्रमाणात उपलब्ध आहेत.पार्किंग व भाजीपाला मार्केटची समस्या आहे.ती सोडवण्याच्या दृष्टीने काही अंशी प्रयत्न झाले,पण ते प्रभावी ठरू शकले नाहीत.अंबाडी रोड वर दररोज शेकडो वाहने उभी असतात.येथे ऑटोमोबाईल व्यवसायिकांची अनेक दुकाने असून त्यांचे कर्मचारी भररस्त्यावर वाहनांच्या दुरुस्तीची कामे करत असतात.त्याचा सर्वसामान्य नागरिकांना त्रास होत असतो.काही वर्षांपूर्वी या रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले,पण त्याचा फायदा नागरिकांना होण्याऐवजी दुकानदारांना झाला.यावर कायमस्वरूपी उपाययोजना व्हावी,अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे.येथे भाजीपाला मार्केट आहे,पण त्याची अवस्था अतिशय गलिच्छ अशी आहे.वास्तविक या भाजीपाला मार्केटमध्ये असलेली अस्वच्छता लक्षात घेऊन या भागात महानगरपालिकेने अद्ययावत मार्केट बांधायला हवे.त्यादृष्टीने गेल्या पंधरा वर्षात जाणीवपूर्वक प्रयत्न झाले नाहीत.

