जव्हार प्रतिनिधी,
जव्हार येथे शैक्षणिक साहित्य व पोषण आहाराचे वाटप,
सकल आदिवासी संस्था, कल्याणच्या महिला पदाधिकारी आणि दात्यांतर्फे आज शिरोशी व तळ्याचापाडा तसेच ग्रामपंचायत जुने जव्हार येथे गणवेश व शैक्षणिक साहित्य वितरण करण्यात आले. तसेच याच कार्यक्रमात गरोदर माता-भगिनींसाठी पूरक आहार आणि नवरात्र भेट कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न झाला.
सदर कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक आदिवासी तारपा नृत्याने करण्यात आले. त्यानंतर
संस्थेच्या अध्यक्षा सुनंदा डेकाटे, सचिव योगिनी कोसराबे,कोषाध्यक्षा संगीता निनावे,तसेच सदस्या कांता आष्टीकर व वृषाली मसुरकर यांनी विद्यार्थी आणि गरोदर माता-भगिनींची आपुलकीने विचारपूस करून मार्गदर्शन केले.यावेळी ते म्हणाले की, “आम्हीही आपल्या आदिवासी समाजाचे असून,जास्तीत जास्त गरीब व गरजू विद्यार्थ्यांनी प्रगती करून उज्ज्वल भविष्य घडवावे. आवश्यक मदतीसाठी आम्ही सदैव आपल्या सोबत आहोत.” त्यानंतर दुपारी जिल्हा परिषद शाळा जुनी जव्हार येथे झालेल्या कार्यक्रमानंतर पाहुण्यांनी आदिवासी भागातील पारंपरिक जेवण – नागलीची भाकरी व उडदाचा भुज्या -वरण यांचा आस्वाद घेतला.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा परिषद शाळा तळ्याचापाडा मुख्याध्यापक महादू वाढू, शिक्षक चंद्रकांत मुकणे, शिरोशी शाळेच्या मुख्याध्यापिका सुनंदा भुसारा,व अन्य मान्यवरांनी मेहनत घेतली.तसेच तारपा वादक जगन खरपडे आणि तारपा नृत्यसमूहाचे, तसेच गरोदर माता-भगिनींना निरोप देण्यासाठी उपस्थित राहिलेल्या सुनंदा भोये, ज्योती माढा व ज्योती चव्हाण यांचे आभार व्यक्त करण्यात आले.ग्रामस्थांनी सकल आदिवासी संस्था, कल्याणच्या महिला पदाधिकारी व दात्यांचे मनःपूर्वक आभार मानले.

