वसंत भोईर,वाडा
अन्यायकारक करवाढ मागे घ्या,अन्यथा तीव्र आंदोलन,
वाडा नगरपंचायतीने अलीकडेच निवासी व व्यापारी मालमत्तेच्या सुधारित कर आकारणीच्या नोटीसीचे वाटप सुरु केले आहे.अचानक झालेल्या करवाढीने येथील नागरिक हवालदिल झाले असुन नागरिक व व्यापारी यांच्यावर अतिरिक्त कराचा बोजा पडला आहे.वाढीव करवाढ शिथिल करा,अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा महाविकास आघाडीने नगरपंचायत प्रशासनाला दिला आहे.
महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने मुख्याधिकारी मनोज पष्टे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले आहे.वाडा नगरपंचायत ही नव्याने स्थापन झालेली नगरपंचायत असून त्यावर मालमत्ता व दिवाबत्ती करासोबतच वृक्ष कर,शिक्षण कर,रोजगार हमी कर,अग्निशमन कर,उपयोग कर्ता,अशा अतिरिक्त करांचीही वाढ झाली आहे.या वाढीव करामुळे नागरिक व व्यापारी यांच्या करामध्ये अवाढव्य वाढ झालेली आहे.अचानक झालेल्या करवाढीमुळे शहरातील नागरिक हवालदिल झाले आहेत नगरपंचायतीचा दर्जा पाहता व ग्रामीण भागाचा विचार करता अन्यायकारक करवाढ येथील व्यापारी व नागरिकांना परवडणारी नाही.
नागरिकांच्या संतप्त भावनेचा विचार करून करवाढ शिथिल करावी, अन्यथा ६ ऑक्टो.रोजी महाविकास आघाडीतर्फे नगरपंचायत कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.यावेळी महाविकास आघाडीचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

