जव्हार प्रतिनिधी,
जव्हारच्या शिरोशी ग्रामपंचायतीमध्ये रानभाज्यांचे प्रदर्शन,
राष्ट्रीय पोषण महिना ( १ ते ३० सप्टें. ) तसेच मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत आज ग्रामपंचायत शिरोशी येथे रानभाजी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन ग्रामपंचायतीच्या सरपंच योगीता शेंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.
यावेळी ग्रामपंचायत ग्रामसेवक,रोजगार सेवक,पेशा मोबीलायझर,गावातील महिला बचत गट तसेच चारही अंगणवाडींच्या सेविका मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.ऍक्शन अगेन्स हंगर या संस्थेचे प्रतिनिधी भोये यांनी रानभाज्यांचे पोषणमूल्य व मुलांच्या आरोग्यासाठी त्यांचे महत्त्व समजावून सांगितले. तर निखंडे यांनी “आहाराचा तिरंगा,” याबाबत मार्गदर्शन करत विविध भाज्यांचा आहारात समावेश करण्याची आवश्यकता अधोरेखित केली.समारोप प्रसंगी सरपंच योगीता शेंडे यांनी ग्रामपंचायतीतर्फे सहभागी महिला,अंगणवाडी सेविका,आशा वर्कर तसेच उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.त्यानंतर रानभाज्यांपासून बनवलेल्या विविध पदार्थांचा आस्वाद घेण्यात आला आणि स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.या रानभाजी मेळाव्यात तब्बल ३८ प्रकारच्या रानभाज्यांचे प्रदर्शन करण्यात आले.या माध्यमातून ग्रामस्थांमध्ये पोषणाबाबत जनजागृती झाली आणि आहारात रानभाज्यांचा समावेश करण्याचे महत्व उपस्थित मान्यवराना कळू शकले.

