वाडा प्रतिनिधी,
भरपावसात कामगारांचे कुटुंबासह बेमुदत उपोषण,
तालुक्यातील कुडूस ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या कोकाकोला या कंपनीतील कंत्राटी कामगारांना कामावरून काढून टाकले असून या कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे.वारंवार सांगूनही ठेकेदार, कामावर घेण्यास टाळाटाळ करत असल्याने संतापलेल्या कामगारांनी आजपासून तहसीलदार कार्यालयासमोर श्रमजीवी संघटनेच्या झेंड्याखाली बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
अंकल चौधरी,समाधान देहाडे,रूपेश चौधरी,संजय कातवारे व प्रकाश सोनावणे अशी कुटुंबासह उपोषणास बसलेल्या कामगारांची नावे आहेत.
वाडा तालुक्यातील कुडूस येथे शितपेय बनवणारी कंपनी असून या कंपनीत सदर कामगार अनेक वर्षापासून कंत्राटी पद्धतीने क्विस क्रोप प्रा. लि.या ठेकेदार कंपनीच्या माध्यमातून काम करीत होते.सदर कामगारांना कोणतीही पूर्वसूचना न देता गेल्या मे महिन्यापासून कामावरून काढून टाकण्यात आले आहे.त्यानंतर कामगारांनी तहसीलदारांकडे या संदर्भात तक्रार दाखल केली.या तक्रारीच्या अनुषंगाने १४ मे रोजी ठेकेदार व कामगार यांची संयुक्त बैठक तहसील कार्यालयात आयोजित करण्यात आली होती.या बैठकीत १ जुलैपासून कामगारांना कामावर घेण्याचे ठेकेदार गंगाधर सोनावणे यांनी लेखी पत्र दिले होते.पंरतू सदर कामगारांना कामावर घेण्यात आले नाही.वारंवार सांगूनही ठेकेदार उडवा उडवीची उत्तरे देत असतो. त्यामुळे या पिडीत कामगारांवर सध्या उपासमारीची वेळ आली आहे.
अखेर संतापलेल्या कामगारांनी कुटुंबासह आजपासून तहसीलदार कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.या उपोषणात लहान मुलेही सहभागी झाली असून भरपावसात ती भिजत बसली आहेत.न्याय मिळेपर्यंत बेमुदत उपोषण सुरूच राहील असा निर्धार उपोषणकर्त्यांनी केला आहे.
शासकीय कामानिमित्त मी बाहेर असून उद्या आल्यानंतर कंपनीबरोबर चर्चा करू,अशी माहिती तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली आहे.
यासंदर्भात क्विस क्रोप प्रा.लि चे संचालक गंगाधर सोनावणे यांच्याशी संपर्क साधला असता आम्ही त्या कामगारांना दुसरीकडे म्हणजेच डी मार्टमध्ये काम द्यायला तयार आहोत,मात्र ते कामगार तेथेच काम द्या, म्हणून सांगत आहेत.यावर आम्ही मार्ग काढू अशी माहिती त्यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना दिली.

