दीपक मोहिते,
निवडणूक पर्व – प्रभाग क्र.१७,
बहुजन विकास आघाडीसमोर प्रभाग टिकवण्याचे मोठे आव्हान,
नालासोपारा शहराच्या पूर्व व पश्चिम भागात पसरलेल्या या प्रभागात गेल्या पंधरा वर्षात असंख्य लोडबेअरिंग इमारती ( अनधिकृत ) उभ्या राहिल्या,त्या कोणी बांधल्या ? या अनधिकृत इमारतींना वीज व पाणी कसे मिळाले ? त्याबदल्यात महानगरपालिकेला घरपट्टीच्या स्वरूपात किती महसूल मिळाला ? व या प्रभागात असंख्य इमारतींना शास्ती का लावण्यात आल्या नाहीत,इ.प्रश्न गेली अनेक वर्षे अनुत्तरितच आहेत आणि त्याची उत्तरे पुढेही मिळणार नाहीत.कारण या गोरखधंद्यात सर्वच राजकीय पक्षाचे पदाधिकारी,कार्यकर्ते व अधिकारी आखंड बुडाले आहेत.महानगरपालिकेचे पाणी काही लोकप्रतिनीधीच कसे विकतात ? याविषयीचे मजेदार किस्से या प्रभागात ऐकायला मिळतात.
असो,या प्रभागात अनेक नागरी समस्या भेडसावत असतानाही या प्रभागाची लोकसंख्या गेल्या पंधरा वर्षात भरमसाठ वाढत गेली.त्याचा ताण नागरी सुविधा देणाऱ्या यंत्रणांवर चांगलाच पडला.
या प्रभागात मध्यमवर्गीयांचा सर्वाधिक भरणा आहे.” स्वस्त आणि मस्त,” स्वरूपात खोल्या मिळत असल्यामुळे या प्रभागाची लोकसंख्या सतत वाढत गेली.त्यामुळे साफसफाई व पाणीपुरवठा इ.समस्या नागरिकांच्या कायम पाचवीला पूजल्या आहेत.येथे ४६ हजार ६५९ इतकी लोकसंख्या असून अनु.जाती – २ हजार १२९ तर अनु.जमाती – ७९२ अशी वर्गवारी आहे.अंबावाडी,नागले तलाव,पाचअंबा,काजूपाडा,गालानगर,शिर्डीनगर,
संख्येश्वर नगर,भीमडोंगरी,कृपानगर,एम.डी.नगर,चंद्रेश हिल्स,साडी कंपाऊंड व ख्रिस्तराज स्कुल परिसर,इ.परिसराचा या प्रभागात समावेश आहे.या प्रभागावर बहुजन विकास आघाडीचे कायम वर्चस्व राहिले,ते टिकवून ठेवण्यासाठी पक्षाला या निवडणुकीत बविआची संपूर्ण ताकद पणाला लागणार आहे.

