दीपक मोहिते,
निवडणूक पर्व – प्रभाग क्र.१६,
या प्रभागात भाजप व बविआ अशी सरळ लढत होण्याची शक्यता…
प्रभाग क्र.१६ हा मध्यमवर्गीयांचा प्रभाग म्हणून ओळखला जातो.या प्रभागात सुमारे सातशे ते आठशे गृहनिर्माण संस्था आहेत.नगरपरिषदेच्या काळात या प्रभागात असंख्य बांधकामे उभी राहिली.त्याकाळी या वसाहतीमध्ये राहणाऱ्या रहिवाश्यांना केवळ टँकरच्या पाण्याचा आधार होता.महिन्याकाठी
रहिवाश्याना त्यासाठी हजारो रु.ची पदरमोड करावी लागत असे.नागरी सुविधांचा दुष्काळ असताना नगरपरिषदेने सरसकट बांधकाम परवानग्या दिल्या.त्यामुळे हजारो सदनिकाधारकाना अनेक वर्षे मरणयातना भोगाव्या लागल्या व आजही ते भोगतच आहेत.विविध जाती – धर्माचे लोक या प्रभागात वास्तव्याला आहेत.पण त्यांना अनेक अडचणी व नागरी समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.अनधिकृत इमारती मोठ्या संख्येने आहेत.पण कुतूहलाची बाब म्हणजे या प्रभागात झोपडपट्ट्या नाहीत.
प्रभागात काही ठिकाणी समाजकंटकांनी खुले भाजीपाला मार्केट उभी केली आहेत.या मार्केटमधील अस्वच्छता नागरिकांच्या पाचवीला पुजली आहे.रस्ते सफाईचे कोट्यवधी रु.चे ठेके देण्यात आले आहेत.पण साफसफाईची कामे नित्यनेमाने होत नाहीत.महानगरपालिकेच्या ठेकेदार,वरिष्ठ अधिकारी व आरोग्य विभागाचे कर्मचारी यांच्या संगनमताने सफाईच्या कामात जनतेच्या पैश्याची लूट होत असते.स्थानिक नगरसेवकही या लोकांकडून होणाऱ्या गोरखधंद्याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष करत असतात.
अशा या प्रभागात सुमारे ४४ हजार ६४७ मतदार आहेत.त्यापैकी १ हजार ८७१ मतदार अनु.जाती तर ५५९ मतदार अनु.जमाती.चे आहेत.हा प्रभाग नगरपरिषदेच्या काळात एकसंघ शिवसेनेचा गड म्हणून ओळखला जात असे,कालांतराने म्हणजे महानगरपालिका अस्तित्वात आल्यानंतर सेनेच्या हातून तो निसटला.आगामी निवडणुकीत तो कोणाकडे जातो,हे पाहायला लागेल.या प्रभागात सेन्ट्रल पार्क,रेहमत नगर,लक्ष्मीनगर,साईबाजार,तुळींज सिग्नल,तुळींज पोलीस ठाणे,महेश पार्क,साईनाथ नगर,सुकांचना अपार्टमेंट व गांधी निवास परिसर याचा समावेश आहे.महानगरपालिकेच्याआगामी निवडणुकीत या प्रभागात बहुजन विकास आघाडी व महायुतीमध्ये सरळ लढत होण्याची शक्यता आहे.महायुतीच्या माध्यमातून लढले तर ही जागा शिंदे गटाकडे जाण्याची शक्यता आहे.पण त्यांच्याकडे सक्षम उमेदवार नसल्यामुळे भाजप आपला उमेदवार रिंगणात उतरवेल,असा अंदाज आहे.

