दीपक मोहिते,
जिल्हा परिषद / पं.स.निवडणूक रणसंग्राम – विक्रमगड,
विक्रमगडच्या निवडणुकीत महायुतीचेच वर्चस्व राहणार,
तलासरी व डहाणू तालुक्याप्रमाणे विक्रमगड तालुका देखील आदिवासीबहुल तालुका आहे.त्यामुळे या तालुक्यालाही आदिवासी दर्जा मिळाला आहे.या तालुक्याचा बराचसा भाग जंगल,डोंगर व दऱ्या खोऱ्याने व्यापलेला आहे.या तालुक्यात दरवर्षी सरासरी अडीच हजार मी.मी.पाऊस पडतो.येथील स्थानिक भूमिपुत्र हे कृषी क्षेत्रावर अवलंबून आहेत व त्यांचे भातपिक हे प्रमुख पीक आहे.तसेच डोंगराळ भागात नागली,वरई व खुरासणी पिके घेण्यात येतात.२६ जाने.२००२ साली या तालुक्याची निर्मिती झाली,मात्र या तालुक्याने गेल्या २३ वर्षात कात टाकली नाही.या काळात जनतेच्या दरडोई उत्पन्नात वाढ होऊ शकली नाही.त्यामुळे आजही हजारो कुटुंबे दारिद्र रेषेखालील कुटुंबाच्या यादीत पाहायला मिळतात.सरकारची उदासीनता व लोकप्रतिनिधी/ शासकीय अधिकाऱ्यांची निष्क्रियता, त्यास सर्वस्वी जबाबदार आहे.काही वर्षांपूर्वी राज्य सरकारने वाडा,तलासरी,मोखाडा,सह विक्रमगडमध्येही नगर पंचायतीची निर्मिती केली,पण विक्रमगड शहराचा मागासलेपणा नाहीसा होऊ शकला नाही.ग्रामीण भागात आजही अठरापगड दारिद्र जनतेच्या पाचवीला पुजले आहे.
असो,शहरी भागात नगरपंचायत व ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विकासकामे करण्यात येत असतात.पण विक्रमगडवासीय जनता आजही अंधारात चाचपडत आहे.या तालुक्यात जिल्हा परिषदेचे ५ गट व १० गण आहेत.तालुक्याला आदिवासी दर्जा असल्यामुळे केंद्र व राज्य सरकारकडून मोठ्याप्रमाणात आर्थिक निधी मिळत असतो.पण त्याचा विनियोग योग्य पद्धतीने होत नसल्यामुळे स्थानिक भूमिपुत्र उपेक्षित जीवन जगत आहेत.राजकीयदृष्ट्या हा तालुका अत्यंत संवेदनशील असा असून या तालुक्यात जव्हार,मोखाडा व खोडाळा,या गावाचा समावेश आहे.२०१९ चा अपवाद वगळता या विधानसभा मतदारसंघावर भाजपचे कायम वर्चस्व राहिले.२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील भुसारा यांनी भाजपच्या डॉ.हेमंत सवरा यांचा दणदणीत पराभव करत विजय मिळवला होता.पण,तो त्यांना टिकवता आला नाही व यंदा झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या हरिश्चंद्र भोये यांनी बाजी मारली.अशा परिस्थितीमध्ये येत्या चार महिन्यात जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका होत आहेत.येथे १९ – तलवाडा,२० मलवाडा,२१ – दादडे,२२ – कुर्झे व २३ – ओलांडा,असे पाच गट असून त्या अंतर्गत १० पंचायत समिती गण आहेत.येथे आजच्या घडीला महायुतीची ताकद मजबूत असून शिंदे गट व भाजप जर एकत्रितपणे लढले तर महाविकास आघाडीची डाळ शिजू शकणार नाही.जिजाऊ या मातब्बर संघटनेचे सर्वेसर्वा निलेश सांबरे हे काही महिन्यांपूर्वी शिवसेनेत ( शिंदे गट ) दाखल झाल्यामुळे शिंदे गटाचीही तालुक्यात ताकद वाढली आहे.या घडामोडी लक्षात घेऊन भाजपनेही शिंदे गटाचा मोहरा गळाला लावला.जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रकाश निकम यांना भाजपने पक्षात प्रवेश देऊन शिंदे गटाला बऱ्यापैकी आव्हान उभे केले आहे.त्यामुळे शिंदे गटाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी ” आम्ही देखील अशाप्रकारची फोडाफोडी करू शकतो,असा गर्भित इशारा दिला होता.या दोन्ही गटात तीव्र स्वरूपाचे मतभेद असले तरी यंदाच्या निवडणुकीत महायुतीचेच वर्चस्व राहील,असे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.

