दीपक मोहिते,
निवडणूक पर्व – प्रभाग क्र.१४,
या प्रभागात समस्यांचा डोंगर ; लोकप्रतिनिधी व नोकरशाही कुंभकर्णाच्या निद्रेत,
नालासोपारा पश्चिम भागाचा समावेश असलेल्या या प्रभागात संमिश्र अशी समाजरचना आहे.गुजराती,मराठी,
मुस्लिम,दाक्षिणात्य व काही अंशी ख्रिस्ती,असा हा सर्वसमावेशक प्रभाग आहे.विकासाचे अनेक प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत.नागरी सुविधांचा पत्ता नसतानाही नगरपरिषदेच्या काळात सर्रास बांधकाम परवानग्या दिल्या गेल्या.त्यामुळे नियोजनाअभावी या शहराचा चेहरा पार विद्रुप होत गेला.त्याचा त्रास मात्र करदात्यांना सहन करावा लागला.वास्तविक त्रास म्हणण्याऐवजी येथील नागरिकांनी प्रचंड यातना भोगल्या,असं म्हंटल्यास ते चुकीचे ठरणार आहे.नगरपरीषद असताना लोकप्रतिनिधी व नोकरशाहीने आपल्या भ्रष्ट कारभाराने शहराचे अक्षरशः लचके तोडले व त्यानंतर आलेल्या महानगरपालिकेनेही नगरपरिषदेच्या पावलावर पाऊल ठेवत आपला कारभार केला.त्यामुळे करदात्यांची अवस्था ” आगीतून फुफाट्यात,” झाली.आजही या शहरात हजारो इमारतींना घरपट्ट्या लागलेल्या नाहीत,ज्या इमारतींना घरपट्ट्या लावण्यात आल्या आहेत,त्याची वसुली होत नाही.परिणामी घरपट्ट्यांची थकबाकी कोट्यवधी रु.च्या घरात पोहोचली आहे.घरपट्टी न भरणाऱ्या सदनिकाधारकांवर कायदेशीर कारवाई करणे,वसुलीच्या नोटीसा बजावणे,सदनिका सील करणे,अशा उपाययोजना प्रशासन करत नाही.त्यामुळे या परिसरात विकासाची गंगा अवतरली नाही.

या प्रभागावर गेली अनेक वर्षे बहुजन विकास आघाडीचे निर्विवाद वर्चस्व आहे.पहिल्या दोनही निवडणुकामध्ये त्यांचे वर्चस्व राहिले.त्यानंतर २०२० साली कोरोनामुळे आलेल्या प्रशासकीय राजवटीमध्ये गैरव्यवहार व गोरखधंद्यात वाढ होत गेली.नोकरशाही सार्वजनिक पैश्याची उधळपट्टी कशी करते ? याचे ही महानगरपालिका उत्तम उदाहरण आहे.
या प्रभागात ४१ हजार २०८ मतदार असून त्यापैकी अनु.जाती – २ हजार २६६ तर अनु.जमाती – ७१३ आहेत.त्यामध्ये सोपारा गाव,चक्रेश्वर तलाव,चक्रेश्वर महादेव मंदिर,भंडार आळी,भाटीला तलाव,
शुर्पारक मैदान,डांगे कॉलोनी,महात्मा फुले नगर,लक्ष्मीबेन छेडा नगर,हनुमाननगर,पांचाळ नगर,नालासोपारा एसटी आगार परिसर,पाटणकर पार्क,डांगे कॉम्प्लेक्स,सिद्धिविनायक नगर,चक्रधरनगर,करारी राईस मिल,मैत्री अपार्टमेंट,डांगे वाडी,अमी पार्क, बुऱ्हाण चौक आणि वाझा मोहल्ला,या परिसराचा समावेश आहे.प्रभागाचे प्रचंड क्षेत्रफळ लक्षात घेता या प्रभागात निवडणूक लढवणाऱ्या सर्व उमेदवारांची चांगलीच दमछाक होणार आहे.या प्रभागात महायुती,बविआ,
महाविकास आघाडी,मनसे या राजकीय पक्षात लढत होण्याची शक्यता आहे.
यावेळी होणाऱ्या निवडणुकीत मतदार महायुतीला संधी देणार की महाविकास आघाडीला डोक्यावर घेतात,याकडे नालासोपारावासीयांचे लक्ष लागले आहे.

