वाडा प्रतिनिधी,
वाडा येथे खड्ड्याने घेतला तरूणाचा बळी,
वाडा- भिवंडी महामार्गावरील खुपरी गावाच्या हद्दीत प्रशांती हाॅटेल जवळ आज सकाळच्या सुमारास खड्डा चुकवताना झालेल्या अपघातात एका निष्पाप तरूणाचा बळी गेला. या घटनेने पंचक्रोशीतील अनेक गावातील ग्रामस्थ संताप व्यक्त करत आहेत.
स्मित आगिवले ( वय १९ )असे त्या दुर्दैवी तरूणाचे नाव असुन पोलीस सुत्राने दिलेल्या माहितीनुसार,वाडा तालुक्यातील पिक या गावात राहणारा स्मित हा तरूण ब्लू स्टार या कंपनीत कामाला होता.तो आज सकाळी आपल्या दुचाकीवरून कंपनीत कामावर जात असताना रस्त्यावरील खड्डा चुकवताना कंटेनर खाली सापडून जागीच त्याचा मृत्यू झाला.या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गलथान कारभाराविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.स्मित हा आई वडिलांचा एकुलता एक मुलगा होता.
भिवंडी – वाडा – मनोर हा रस्ता खड्ड्यात गेला असून रस्त्यावर प्रचंड खड्डे पडले आहेत.गेली बारा ते तेरा वर्षे या रस्त्याची दुरवस्था झाली आहे.गेल्या बारा ते तेरा वर्षात सुमारे ६०० हून अधिक लोकांचे बळी या रस्त्यावर गेले आहेत.
दरम्यान तरूणाचा बळी हा ठेकेदार कंपनी ईगल व सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या हलगर्जीपणामुळे झाला असल्याने त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कुटुंबीयांना तत्काल नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी काँग्रेसचे पालघर जिल्हाध्यक्ष प्रफुल पाटील यांनी केली आहे.

