जव्हार प्रतिनिधी,
ग्रामसेवक पतसंस्थेची ४६ वी वार्षिक अधिमंडळ सभा उत्साहात संपन्न,
ठाणे-पालघर जिल्हा ग्रामसेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित,टिटवाळा यांची ४६ वी वार्षिक अधिमंडळ सभा नुकतीच पार पडली.
शांती सरोवर रिसॉर्ट,जव्हार-सेलवास रोड, जयसागर धरण परिसर येथे झालेल्या सभेचे अध्यक्षस्थान संस्थेचे अध्यक्ष गणेश किसन पडवळ यांनी भूषवले.
यावेळी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटनेचे सरचिटणीस सूचित घरत, संस्था व अन्य पदाधिकारी,कर्मचारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सभेच्या प्रारंभी अहवाल सालातील दिवंगत सभासदांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर सेवानिवृत्त झालेल्या सभासदांचा सत्कार करून त्यांच्या योगदानाची दखल घेण्यात आली.मागील अधिमंडळ बैठकीचा इतीवृत्तांत सर्वानुमते मंजूर करण्यात आला.
संचालक मंडळाने सादर केलेला सन २०२४-२५ या आर्थिक वर्षाचा अहवाल, ताळेबंद,नफा-तोटा पत्रक तसेच अंदाजपत्रक यांना मंजुरी देण्यात आली.संस्थेच्या नफा वाटपालाही मंजुरी देण्यात आली.याशिवाय लेखापरिक्षण,अंतर्गत तपासणी व दोषदुरुस्ती अहवाल यावर सविस्तर चर्चा करून ते मंजूर करण्यात आले.
सन २०२५-२६ या वर्षाकरिता अंतर्गत हिशेब तपासनीस व वैधानिक लेखापरिक्षक यांच्या नेमणुका करण्यात आल्या. तसेच संस्थेचे नोंदणी प्रमाणपत्र दुरुस्त करण्याचा ठराव सभेत मंजूर झाला. अध्यक्षांच्या परवानगीने आयत्यावेळी आलेल्या विषयांवरही चर्चा करून निर्णय घेण्यात आले.
सभेच्या शेवटी आभार प्रदर्शन करून राष्ट्रगीताने सभेची सांगता करण्यात आली.

