दीपक मोहिते,
आमच्या अटी मान्य करा,अन्यथा आमचा बहिष्कार,
पितृपक्ष पंधरवडा दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो,तो पंधरा दिवस असतो.तो आता सुरू झाला आहे.मित्रानो,वर्षानुवर्षे आपल्या ज्या मागण्या प्रलंबित आहेत,त्यावर विचारविनिमय करण्यासाठी ही आपण वार्षिक सर्वसाधारण सभा बोलावली आहे.खाली नमूद केलेल्या मागण्यांवर आपण विचार करणार आहोत.प्रत्येक सदस्यांनी आपापली मते मांडावीत,अशी अपेक्षा आहे.
१) आमच्यासाठी ठेवण्यात येणाऱ्या वाडीत सकस तसेच उत्तम दर्जाचा पोषण आहार असावा,
२) वाडी ठेवल्यानंतर पितरांच्या नातेवाईकांनी काव,काव,असे किंचाळत आम्हाला बोलवू नये,तर आम्हाला सन्मानपूर्वक साद घालावी,अन्यथा आम्ही वाड्यांवर बहिष्कार टाकू.
३) तीन इंजिन सरकारने आमच्या समुहासाठी ” आमचा लाडका कावळा,” अशी योजना सुरू करावी,
४) पितृपक्ष पंधरवडा संपला कि आमची जी हेटाळणी सुरू होते,ती रोखण्यात यावी,यामध्ये दोषी ठरणाऱ्या लोकांवर कठोर कारवाई व्हावी,त्यासाठी अँस्ट्रोसिटी सारखा कायदा करण्यात यावा.
५) सध्या आमच्या शरीरावर असलेला काळा रंग आम्हाला नकोसा झाला आहे,तो बदलून गुलाबी रंग देण्यात यावा,*
६) आमच्यासाठी सरकारने दरवर्षी ” महाराष्ट्रभूषण डोमकावळा पुरस्कार,” द्यावा.
या पाच मागण्यांचे निवेदन आपण लवकरच मुख्यमंत्र्यांना देणार आहोत,त्यांच्या भेटीसाठी जाणाऱ्या शिष्टमंडळातील कावळ्यांनी सफेद व गुलाबी रंगाचा पेहराव करून यायचे आहे.

