दीपक मोहिते,
जिल्हा परिषद / पं.स. निवडणूक रणसंग्राम – तलासरी अनु.जमाती,
जिल्हा परिषद निवडणुका ; तलासरीचा गड भेदणे,भाजपला शक्य होणार नाही…
अनु.जमातीसाठी कायम आरक्षित असलेल्या या तालुक्यात जिल्हा परिषदेचे एकूण ५ गट तर पंचायत समितीचे एकूण १० गण आहेत.
त्यामध्ये १ – उपलाट,२ – सूत्रकार,३ – डोंगारी,४ – वसा व ५ – वडवली,तर पंचायत समितीच्या १० गणाचा समावेश आहे.
महाराष्ट्र – गुजरातच्या सीमेवर असलेल्या या तालुक्याच्या विकासाला गेल्या सात ते आठ वर्षात प्रचंड वेग आला. व्यापार व औद्योगिक वाढीला चालना मिळाली.त्यासोबत लोकसंख्या वाढीचा वेलू देखील गगनावर गेला. परिसरात वाढत असलेले नागरीकरण लक्षात घेऊन राज्यशासनाने काही वर्षांपूर्वी येथे नगरपंचायतीची स्थापना केली.पण शहरी भागातील विकासाचा अनुशेष भरून निघू शकला नाही.तलासरी तालुका हा गेली तीन ते चार दशके मार्क्सवादी कम्यु.पक्षाचा गड राहिला असुन भाजपने येथे आपले पाय रोवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले.पण त्यांच्या या प्रयत्नांना फारसे यश मिळू शकले नाही.विधानसभा जागेवरही मार्क्सवादी कम्यु. पक्षाचे कायम वर्चस्व राहीले.केवळ २०१४ साली भाजपने बाजी मारली,पण इतर निवडणुकांमध्ये मार्क्सवादी कम्यु.पक्षाने भाजपची डाळ शिजू दिली नाही.आजही या तालुक्यात कम्यु.ना रोखणे भाजपला शक्य होणार नाही.भाजपचे नेते स्व.गोपीनाथ मुंडे यांनी माजी खा.चिंतामण वनगा यांच्या साथीने कम्यु.चा हा गड छेदण्याचा अनेकदा प्रयत्न केला.पण त्यांनाही यश आले नाही,उलट एकदा त्यांच्या जीवावर बेतले होते.आदिवासीबहुल असलेल्या या तालुक्यात जमीन खरेदीला सध्या चांगलाच वेग आला आहे महाराष्ट्र व गुजरात या दोन्ही राज्यातील धनधांडग्यानी जमिनी खरेदी करण्याचा सपाटा लावला आहे.त्यामुळे तालुक्यातील कृषीक्षेत्र कमी होत चालले आहे.स्थानिक आदिवासी शेतकरी आजवर भातशेतीची लागवड करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवायचे, पण शेतीच्या जमिनी गिळकृत झाल्या व आदिवासी समाजाची नोकरीच्या शोधात भटकंती सुरु झाली.तालुक्यात कारखाने उभारण्यात आले असले तरी स्थानिक तरुण व तरुणीना रोजगारांसाठी शेजारी असलेल्या गुजरात राज्यातील उंबरगांव येथील औद्योगिक क्षेत्र गाठावे लागते.या तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजप – मार्क्स. कम्यु.असा सामना रंगेल,अशी शक्यता आहे.

