दीपक मोहिते,
निवडणूक पर्व – प्रभाग क्र.१२,
विकासकामे केली असती तर सेल्फी काढायची पाळी आली नसती…
विरार पश्चिमेस असलेल्या या प्रभागात गेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत येथील मतदारांनी भाजपला भरभरून साथ दिली होती.त्यामुळे या प्रभागातून निवडणूक लढवण्यासाठी भाजपमध्ये इच्छुक उमेदवारांची भाऊगर्दी झाल्याचे पाहायला मिळत आहे.हा प्रभाग सुशिक्षित मतदारांचा प्रभाग म्हणून ओळखला जातो.त्यामुळे या प्रभागात प्रत्येक राजकीय पक्षाला गुजराती चेहरा द्यावा लागणार आहे.गोकुल टाऊनशिप या वसाहतीमधून होणारे मतदान हे निर्णायक ठरणार आहे.
या प्रभागात ३८ हजार ९३३ मतदार आहेत,त्यापैकी १ हजार १६६ अनु.जाती तर अनु.जमातीचे १ हजार ८६६ मतदार आहेत.प्रभागात म्हाडा वसाहत,मेफेअर,गोकुल टाऊनशिप,विनय एनक्लेव्ह,पद्मावती नगर,आगाशी कोफराड,वटार,नवापूर, नवापूर चौपाटी,दोन तलाव, उंबरगोठण,बोळेश्वरी मंदिर परिसर,स्पोर्ट्स कॉम्पलेक्स,खारोडी नाका, सहयोग हॉस्पिटल व पुरापाडा इ.परिसराचा समावेश आहे.
दर पावसाळ्यात प्रभागातील म्हाडा वसाहत वगळता इतर सर्व परिसर किमान तीन दिवस पाण्याखाली जात असतो.काही ठराविक नागरी वसाहतीचा अपवाद वगळता इतर परिसरातील नागरिकांना दर पावसाळ्यात प्रचंड प्रमाणात हालअपेष्टा सहन कराव्या लागतात.या प्रभागातील माजी नगरसेवक व नगरसेविका रस्ते व गटाराची कामे सुरु असताना त्याठिकाणी उभे राहून सेल्फी काढण्यात धन्यता मानत असतात.दरवर्षी आपला प्रभाग पाण्याखाली जातो, याविषयी त्यांना खंत वाटत नाही.आपल्या प्रभागातील मतदारांना मुख्य रस्त्यावरून येजा करण्यासाठी ट्रॅक्टरचा वापर करावा लागतो,याचे त्यांना वैषम्य देखील नाही,माध्यमावर आपल्या सेल्फी वायरल करण्यात त्यांना धन्यता वाटत असते.त्यामुळे या अशा नतद्रष्टाना प्रभागातील मतदार या निवडणुकीत धोबीपछाड देण्याच्या तयारीत आहेत. आपल्या कार्यकालात जाणीवपूर्वक विकासकामे केली असती तर सेल्फी काढून ते समाजमाध्यमावर वायरल करण्याचा पोरकटपणा करण्याची पाळी त्यांच्यावर आली नसती,अशी चर्चा आता सर्वत्र सुरु झाली आहे.

