जव्हार प्रतिनिधी,
राजे यशवंत सार्वजनिक वाचनालयाची ७३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न,
राजे यशवंत सार्वजनिक वाचनालय,जव्हारची ७३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा मोठ्या उत्साहात पार पडली. या सभेचे अध्यक्षस्थान वाचनालयाचे अध्यक्ष कमलजीत धानमेहेर यांनी भूषवले.सभेच्या प्रारंभी दीपप्रज्वलन व सरस्वती प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर कार्यवाह मनोज कामडी यांनी प्रस्ताविकामध्ये वाचनालयाची वाटचाल, आतापर्यंत राबविलेले उपक्रम व भावी योजनांची माहिती देऊन उपस्थित सर्व सभासदांचे स्वागत केले. तसेच यावेळी वाचनालयाचे उत्कृष्ट वाचक म्हणून वाचनालयाचे सभासद,वाचक सुभाष बोरसे यांचा अध्यक्षांच्या हस्ते शाल, श्रीफळ व वृक्ष भेट देऊन विशेष सत्कार करून त्यांना प्रोत्साहन देण्यात आले.
सभेच्या कामकाजात मागील सभेचे इतिवृत्त वाचन व अनुमोदन, सन २०२४-२५ चा अहवाल व जमाखर्च मंजुरी,तसेच सन २०२५-२६ साठी लेखापरीक्षकांची नियुक्ती करणे,याविषयी कार्यकारी समितीने निर्णय घ्यावा,असे सर्वानुमते निर्णय घेण्यात आला.त्यानंतर अध्यक्षांच्या अनुमतीने इतर विषयांवर सभासदांनी राजे यशवंत सार्वजनिक वाचनालयाच्या प्रगतीसाठी उपस्थित सभासदांनी नाविन्यपूर्ण संकल्पना व सूचना करून सकारात्मक चर्चा करण्यात आली.त्यानंतर गेल्या आर्थिक वर्षांत वाचनालयाचे माजी कार्यवाह कै.श्याम शिंपी यांच्या निधनानिमित्त भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.सभेच्या शेवटी उपाध्यक्ष हर्षद मेघपुरीया यांनी सर्वांचे आभार मानले व सभा राष्ट्रगीताने संपन्न झाली.या सभेला मोठ्या संख्येने पदाधिकारी व सभासद,वाचक उपस्थित राहून उस्फुर्त प्रतिसाद दिला.

