दीपक मोहिते,
निवडणूक पर्व – प्रभाग क्र.१०,
गुजराती व उत्तर भारतीयांचे मतदान निर्णायक ठरणार…
प्रभाग क्र.१० ची रचना विचित्र अशी असून या प्रभागात निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची प्रचारादरम्यान चांगलीच दमछाक होणार आहे.या प्रभागात एकूण ४६ हजार ९८९ मतदार असून त्यामध्ये अनु.जमाती – २ हजार १६५ तर अनु.जाती – १ हजार २८ मतदारांचा समावेश आहे.
या प्रभागात सर्वाधिक मतदार गुजराती भाषिक आहेत,त्यानंतर उत्तर भारतीय मतदारांचा नंबर लागतो.या दोन्ही समाजाच्या तुलनेत मराठी समाजाची लोकसंख्या फार कमी आहे.गेल्या दोन निवडणुकीत येथील मतदारांनी बहुजन विकास आघाडी व काही प्रमाणात एकसंघ शिवसेनेच्या पदरात मताचे दान टाकले.परंतु आता मात्र चित्र पालटले आहे.येथील मतदारांमध्ये सध्या बदलाचे वातावरण आहे.वर्षानुवर्षे नागरी समस्या मार्गी न लागल्यामुळे मतदारांची मानसिकता बदलल्याचे पहायला मिळत आहे.त्याचा अनुभव गेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत पहायला मिळाला.या प्रभागात गेल्या दोन निवडणुकांमध्ये भाजपने जोरदार मुसंडी मारली होती.त्या पार्श्वभूमीवर महानगरपालिका निवडणुकीत त्याचे प्रतिबिंब उमटण्याची दाट शक्यता आहे.हा प्रभाग विकासाच्या बाबतीत अत्यंत मागासलेला असा आहे.या प्रभागातून निवडून आलेल्या नगरसेवक व नगरसेवकांच्या बाबतीत मतदारांमध्ये प्रचंड नाराजी आहे.अशा परिस्थितीत बहुजन विकास आघाडीने पुन्हा त्यांनाच उमेदवारी दिल्यास या उमेदवारांना मतदार जोरदार फटका देतील,असा अंदाज आहे.रस्त्याची दुरावस्था,वाहतूक कोंडी,अस्वच्छता,पदपथावर अनधिकृत फेरीवाल्यांचे अतिक्रमण,मच्छी व भाजीविक्रेत्याचे भरस्त्यावर ठाण मांडणे,अनधिकृत इमारतीचा सुळसुळाट व अपुरा पाणीपुरवठा अशा विविध कारणामुळे या प्रभागातील नागरिक या निवडणुकीत परिवर्तन घडवून आणण्याच्या तयारीत आहेत.अशा बिकट परिस्थितीत जुन्या लोकांना पुन्हा उमेदवारी दिली गेली तर बविआचे होत्याचे नव्हते होईल,असे त्यांच्याच कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.भाजप मात्र येथे सुशिक्षित तरुणांना संधी देणार आहे.गेल्या दहा वर्षातील सत्ताधारी पक्षाची अकार्यक्षमता,नागरी सुविधांचा उडालेला बोजवारा,प्रशासकीय कामकाजाचा झालेला बट्ट्याबोळ व अनधिकृत बांधकामाना मिळालेले झुकते माप व संरक्षण,इत्यादी बाबी बहुजन विकास आघाडीला त्रासदायक ठरणार आहेत.या निवडणुकीत महायुती तूटली तर या प्रभागात भाजप व शिवसेना ( एकनाथ शिंदे गट ) या दोघांमध्ये सरळ लढत होईल,पण महायुतीच्या माध्यमातून भाजप रिंगणात राहिली तर ही लढत बहुजन विकास आघाडी व भाजप अशी होईल.गेल्या दोन निवडणुकीत भाजपने घेतलेले मताधिक्य लक्षात घेता भाजपचे पारडे अधिक जड असल्याचे दिसून येत आहे.
या प्रभागात प्रगतीनगर, नारीयानगर,बजरंगनगर, नार्लेश्वरनगर,ओमनगर, रहमतनगर,नगीनदास पाडा,ओसवालनगरी, मोरेगाव,दुर्गापरमेश्वरी मंदिर,जिजाई नगर,देशमुख फार्म परिसर व मोरेगाव तलाव परिसर या भागाचा समावेश आहे.

